महिला विद्यापीठ स्थापना दिन विशेष 

0

‘संस्कृता स्त्री पराशक्ती’ (An enlightened woman is a source of infinite strength) या ब्रीदवाक्याने  SNDT महिला विद्यापीठात, स्त्रींना शिक्षण देणाऱ्या एका छोट्याशा संस्थेचे रुपांतर झाले.  महिलांना शिक्षण देणारे दक्षिण-पूर्व आशिया खंडातील पहिले एकमेव विद्यापीठ म्हणून SNDT महिला विद्यापीठ नावारुपास आले.  तसेच महिलांना शिक्षण देणारे SNDT भारतातील पहिले आणि एकमेव विद्यापीठ आहे.   SNDT विद्यापीठाला नेहमीच ‘अ’ श्रेणी नॅक (NAAC) मानांकन प्राप्त असते.  मुलींना शिक्षण देणारे हे केवळ विद्यापीठ न राहता, आजरोजी मुलींच्या उत्तम जडणघडणी करिता एक संस्कारक्षम हक्काचे व्यासपीठ म्हणून SNDT महिला विद्यापीठाचा नावलौकिक आहे.  

SNDT महिला विद्यापीठ स्थापना दिन अर्थातच ‘फाऊंडेशन डे’.  ०५ जुलै, १९१६ या दिवशी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ हिंगे, पुणे याठिकाणी महिला आश्रमात रोवली गेली.  अगदी चार-पाच विद्यार्थींनींना घेऊन छोट्याशा झोपडीत आजचे विद्यापीठाचे प्रतिबिंब उमटले गेले.  वृक्षाचा वटवृक्ष होणे करिता वेळ जरुर लागतो.  आजच्या या शुभदिनी SNDT महिला विद्यापीठाचा प्रवास १०८ वर्षाचा झाला असून विद्यापीठ १०९ व्या वर्षात पदार्पण करत आहे.  या सामाजिक कार्याचा श्री गणेशा भारतरत्न महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी ०५ जुलै १९१६  रोजी केला.  

प्रवाहाच्या विरोधात जाऊन विधायक कामं हाती घ्यावी लागतात.  विधायक सामाजिक कामातून साधारण माणसांना नाव लौकिक मिळतो आणि तिच माणसं आपणांस काही काळ गेल्यानंतर असाधारण वाटू लागतात.  माणसं असाधारण होतात ती त्यांच्या असाधारण कामामुळेच.  प्रवाहाच्या विरोधात जाऊन कर्वे अण्णांनी कामं केला असा वरती उल्लेख करण्या मागचा हेतू आपणा सर्वांना ठाऊक आहेच.   भारतातील सामाजिक असमानतेमुळे देश आणि देशातील असंख्य घटक अनेक महत्वपूर्ण गोष्टींपासून वंचित आणि दूर्लक्षित होते.  शिक्षणासारखा अधिकार हा काही घटकांपर्यंतच सिमित होता.   

अर्थातच आदिवासी, दलित वंचित घटकांना आणि स्त्रींना व्यवस्थेने शिक्षण नाकारले होते.  शिक्षण हेच सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार आहे.  त्याशिवाय सामाजिक परिवर्तन होणे कदापिही शक्य नाही हि बाब अण्णांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचे छोटेसे वृक्ष लावण्याचे धाडस केले.   धाडस हा शब्द प्रयोग याकरिता, तत्कालीन परिस्थितीत मुलींना/महिलांना शिक्षण देण्याचा आणि घेण्याचा अधिकार समाज व्यवस्थेने नाकारला होता आणि समाजाच्या विरोधात जाऊन एखादं पाऊल पुढे टाकणे त्याकाळी प्रचंड धाडसाचे होते.  अशी धाडसाची कामं करताना वाघाचं काळीज लागतं, तसं वाघाचं काळीज असलेल्या काही थोर माणसांच्या नावाचा याठिकाणी उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते.  हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या मानवांना ‘महामानव’ उपाधी त्यांच्या कार्यामुळेच मिळाली आहे.   जो स्वतः करिता आणि कुटुंबा करिता जगतो तो मानव असतो आणि अखंड समाजाच्या भल्या करिता जो जगतो आणि चंदनापरि आपला देह झिजवतो,  तो ‘महामानव’ म्हणून नावारुपास येतो.   या महान व्यक्ति आणि त्यांच्या कुशाग्र बुध्दीमत्तेचे अधिक समर्पक वर्णन इंग्रजी भाषेतील खालील म्हण करु शकते.  

“Scholar’s don’t do different things, they do things differently.”

याठिकाणी मला विशेष करुन नमूद करावे वाटते की, स्त्री शिक्षण, आणि एकुणच स्त्री सक्षमीकरणाचे कार्य पुरुष मंडळींनी मोठया आणि अधिक व्यापक प्रमाणात केले आहे.   छ.शिवाजी महाराज, राजाराम मोहन राय, महात्मा जोतीबा फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षि कर्वे अण्णा यासारख्या महान पुरुषांनी आपल्या परिने स्त्री विकासाकरिता खारीचा वाटा उचला आहे.   प्रत्येक महापुरुषाच्या कार्याला वेगळा आयाम आणि सलाम आहे.  हे महान व्यक्तिमत्व भारतभूमीत जन्मली नसती तर आजची स्त्री अनेक जाचक जाखंडात आणि कर्मकांडात आडकली असती.   SNDT महिला विद्यापीठाच्या शंभरहून अधिक वर्षाच्या सुवर्ण इतिहासात अनेक विद्वान, नामवंत शिक्षणप्रेमी महिलांना विद्यापीठाचे कुलगुरु होता आले आणि सक्षमपणे स्त्री शिक्षणाची आणि सक्षमीकरणाची चळवळ पुढे घेऊन जात आहेत हे केवळ अण्णांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि अण्णांच्या आशिर्वादानेच.  

मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, अशा या गौरवशाली परंपरा असलेल्या विद्यापीठात मला शिक्षक म्हणून सेवा देण्याची संधी मिळाली आहे.  ‘विद्यापीठ स्थापना दिनाचे’ औचित्य साधून SNDTमहिला विद्यापीठाची गौरवशाली परंपरा समाजाला ज्ञात करताना मला विशेष आनंद झाला आहे.  SNDT महिला विद्यापीठातील माझ्या दोन दशकांहून अधिक अखंड सेवेचा वैयक्तिक अनुभव विशद करणे हेतू,  काही महानुभव व्यक्तिच्या नावाचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते आहे.   मी, आज पर्यंत पाच महिला कुलगुरु पाहिल्या आहेत.  प्रोफेसर रुपा शहा मॅडम हया माझ्या पाहण्यातील आणि अनुभवातील पहिल्या कुलगुरु होत.   अतिशय संयमी, अभ्यासपूर्ण, व्यासंगी, बोलके, नेहमीच प्रसन्न मुद्रा असलेले, अनुभव संपन्न,आणि प्रश्नांची जाण असणारे व्यक्तिमत्व.   कुलगुरु असताना आणि कुलगुरु नसताना देखिल विद्यापीठाने आमंत्रित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थितीत राहतात.  त्यांच्या नंतर तीन कुलगुरु नियुक्त झाले आणि प्रोफेसर डॉ. उज्वला चक्रदेव ह्या मी जवळून पाहत आणि अनुभवत असलेल्या पाचव्या कुलगुरु आहेत.   प्रत्येक कुलगुरु अण्णांची स्वप्न साकार करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात, नव्हे तर तो त्यांच्या जबाबदारीचा एक भाग आहे.  प्रोफेसर डॉ. वसुधा कामत मॅडम यांची कुलगुरु म्हणून ची टर्म अनेक नाविण्यपूर्ण उपक्रमातून आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे.  नंतरच्या काळात डॉ. कामत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वरती सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली हि बाब SNDT विद्यापीठ परिवारा करिता अभिमानाची आहे.  

आणि सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) प्रत्येक्षपणे विद्यापीठात राबविण्याची जबाबदारी आदरणीय कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव मॅडम यांचेवर येऊन ठेपली आहे.  मला सांगायला आनंद वाटतो की, कुलगुरु पदाची सुत्रे हाती घेतल्यापासून डॉ. चक्रदेव मॅडम यांनी कामाचा धडाका लावला आहे.  माझ्या पाहण्यातून आणि अनुभवातून नियुक्ती नंतरची पहिले तीन महिने, कुलगुरु मॅडम यांनी प्रत्येक SNDT आवारात जाऊन पाहणी केली, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी संवाद केला आणि आपण अजून काय चांगलं करु शकतो यावर मतं मागवली.   चर्चगेट, जुहू, पुणे आणि श्रीवर्धन कॅम्पस् करिता नवीन शैक्षणिक धोरण राबविणे करिता ॲक्शन प्लान तयार केले आहेत.  विशेष उल्लेखनीय बाब अशी की, पालघर सारख्या आदिवासी दुर्गम भागात शिक्षणाची गंगा घेऊन जाण्याचा मा. कुलगुरु महोदयांचा संकल्प आहे.  त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी मॅडम स्वतः पालघरची जागा आणि परिसर पाहण्यासाठी गेल्या होत्या.  कलेक्टर साहेबांपासून तर अगदी सर्व सामान्य माणसाशी प्रत्येक्ष संवाद मा. कुलगुरु त्यांनी केला आहे.  तसेच पालघरच्या जागेचा वाद संपुष्टात आणून पुन्हा एकदा पालघर येथील जागेचा सातबारावर SNDT विद्यापीठाच्या नावे करण्यात त्यांना यश आले आहे.  शिक्षणाची गंगोत्री वाड्या, वस्त्या, पाड्यात अणि खेड्यात नेणे करिता SNDT विद्यापीठ सॅटॅलाइट टावर पालघर येथे लवकरच उभे करणार आहे.  भव्य दिव्य शैक्षणिक संकुल आणि मुलींचे वस्तीगृह पालघर आवारात लवकरच उभे राहील.  या कार्याची आणि नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याची मुहूर्तमेढ म्हणून प्रेमलिला विट्ठलदास तंत्रनिकेतन या जुहू स्थित नामांकित संस्थेच्या माध्यमातून रोजगाराभिमुख कौशल्य शिक्षण देणारे (skills oriented courses) शाॅर्ट टर्म कोर्सेस त्वरेने सुरु करण्याच्या सूचना कुलगुरु महोदयांनी संबंधितांना दिल्या आहेत.   

खरंतर, नवीन डाव, नवीन गडी आणि नवीन शैक्षणिक धोरणाचा अमंल करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी मॅडम कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव यांचेवर आली आहे आणि या ऐतिहासिक कामाची नोंद SNDT चा हतिहास लिहिताना नक्कीच घ्यावे लागेल याबाबत कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.   अतिशय, शांत, संयमी, अभ्यासपूर्ण, व्यासंगी, सक्षम, उत्साही आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे असं व्यक्तिमत्व SNDT परिवाराला डॉ. उज्वला चक्रदेव मॅडम यांच्या रुपाने लाभले आहे आणि संपूर्ण SNDT परिवारातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मा. कुलगुरु यांच्या प्रेरक विचारामुळे व मार्गदर्शनाखाली एका ध्येयाने आणि निष्ठेने प्रेरित झाली आहेत.  कर्वे अण्णांचे स्वप्न साकार करणेकरिता आणि मा. कुलगुरु  मॅडम यांनी हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेणेकरिता, सर्व SNDT परिवारातील सदस्य तन, मन, धन आणि निष्ठेने पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि उत्साहाने कामाला लागली आहेत.   देशातील काही शक्तीशाली महिलांच्या यादीत डॉ. उज्वला चक्रदेव मॅडम यांच्या नावाची नोंद अनेक उल्लेखनीय मॅक्झिनने घेतलेली आहे.   अमेरिकेतील CUNY आणि तत्सम् विद्यापीठाशी सामंजस्य करार Faculty and Students Exchange) माननीय कुलगुरू यांच्या पुढाकाराने झाले आहेत.  

“Coming together is beginning

Working together is progress

And, living together is success”

SNDT विद्यापीठ स्थापनेच्या आजच्या या शुभ दिनी भारतरत्न महर्षि धोंडो केशव कर्वे अण्णांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन, मॅडम कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव व टीम SNDT तील प्रत्येक सदस्याला/घटकाला आभाळभर हार्दिक शुभेच्छा आणि SNDT महिला विद्यापीठाच्या पुढील उज्वल भविष्याकरिता खूप खूप मंगल कामना…

लेखक – प्रा. डॉ. धर्माजी खरात 

प्रेमलिला विठ्ठलदास तंत्रनिकेतन , dharmaji.kharat@pvp.sndt.ac.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here