नाशिक : नुकतीच शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे सुरज मांढरे यांच्या सोबत मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी यांची शिक्षण आयुक्तालय पुणे येथे बैठक संपन्न झाली. यात मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची गेल्या १३-१४ वर्षा पासूनची फरक बिले प्रलंबित असल्याने शिक्षक मेटाकुटीला आले आहेत. काहींच्या मुला-मुलींची लग्न,आजारपण यासाठी पैसे नसल्याने कर्ज काढावे लागते आहे. तेंव्हा ह्या पुरवणी बिलांना त्वरित मान्यता द्यावी असे मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी.देशमुख यांनी शिक्षण आयुक्त यांना सांगितले. एकट्या नाशिकची १३३ कोटीचे बिले प्रलंबित असल्याचेही त्यांच्या लक्षात आणून दिले.तसेच १००% आधारकार्ड अपलोड करणे शाळांची इच्छा असूनही पूर्तता होऊ शकत नाही .MisMatch त्रुटी दुर करणे हेही लगेच शक्य नसल्याने याला मुदत वाढ मिळावी व संच मान्यतेवर याचा कोणताही परिणाम होऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली . शालार्थ मधील जाचक अटी रद्द करून मान्यता मिळालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित शालार्थ आयडी द्यावे. अनुकंपा तत्वावरील मान्यता त्वरित द्याव्यात. अघोषित शाळेबाबत त्वरित निर्णय घेऊन त्यांना त्वरित २०% अनुदान देण्याची व्यवस्था व्हावी. विना अनुदानित /अंशतः अनुदानित वरून १००% अनुदानित शाळेवर बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण द्यावे.त्यासाठी जाचक अटी टाकू नये. ३३६१ लेखाशिर्षाला अनुदान नियमित उपलब्ध करून द्यावे. RTE कायद्यानुसार विद्यार्थी संख्येप्रमाणे तुकड्यांची मान्यता व शिक्षक भरतीस परवानगी द्यावी.
सेवा निवृत्त झालेल्या रिक्त जागांवर शिक्षक भरतीस परवानगी द्यावी.जेणे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. कोरोना काळापासून शाळांचे थकीत RTE प्रवेश शुल्क त्वरित मिळावे. तसेच शालेय पोषण आहाराचे खाजगी कंपन्याकडून करावयाचे ऑडिट त्वरित थांबवावे. यासर्व विषयावर सखोल चर्चा होऊन हे सर्व प्रश्न धोरणात्मक असल्याने याबाबत लवकर निर्णय घेऊन आपणास कळवू असे आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले. मुख्याध्यापक संघाने वेळोवेळी आमचे शिक्षण उपसंचालक,संचालक यांच्या सोबत बैठका घेऊन शाळांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष केरूभाऊ ढोमसे,प.महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव एस.बी.देशमुख नाशिक, महामंडळाचे सचिव मोतीभाऊ केंद्रे नांदेड, माजी अध्यक्ष मारोती खेडेकर नागपूर, सचिन जगताप वर्धा, अशोक पारधी भंडारा, हनुमंत साखरे नांदेड, नंदकुमार बारावकर पुणे, देविदास उमाठे, संजय शिप्परकर, अशोक मोरे उपस्थित होते.
मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या मागण्यांची शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी घेतली दखल
एकट्या नाशिकची १३३ कोटीचे बिले प्रलंबित