गोंदवले – युग हे स्पर्धेचे म्हणत म्हणत ही स्पर्धा कधी मुलांच्या आयुष्यात शिरली ते आपल्याला कळलेच नाही. आपण आता स्पर्धेच्या युगात आहोत. त्यामुळे इतर मुलांपेक्षा आपण पुढे असावे असे प्रत्येक पालकाला वाटू लागले. इतर मुलांबद्दल नकळतपणे इरशेचा होऊ लागली. खरोखरच इयत्ता पहिलीपासून ही स्पर्धा आवश्यक आहे का ? स्पर्धा केव्हा करावी बरं? यासारख्या प्रश्नांवर आता चर्चा होण्याची गरज निर्माण झाली आहे .
नक्कीच युग हे स्पर्धेचे आहे ,यामध्ये दुमत नाही पण वयाच्या चार-पाच वर्षापासून मुलांना या स्पर्धेत ढकलने किंवा स्पर्धा आहे हे सांगणे म्हणजे आत्ताच मुलांना वेगवेगळ्या तणावाकडे स्वतः बोट धरून नेल्यासारखे आहे. त्याचे बालपण आपण हिरावून तर घेत नाही ना? याची काळजी आता पालकांनी घेणे गरजेचे झाले आहे. अभ्यासाचा ताण मुलांबरोबर पालकही घेताना दिसतात ,जणू आता त्यांचीच परीक्षा आहे आणि या मार्कांवरच नोकरी लागणार आहे. या सर्वांच्या समस्याचा उपाय म्हणजे :”कला”
ही मुलाला वेगवेगळ्या विश्वात नेते .सर्व समस्या विसरायला लावते .तन मन एकाग्र करून सर्व जीव गोळा करून यात हरवायला भाग पडते .
यातून एखादी गोष्ट साध्य झाल्यावर होणारा आनंद ही खूप वेगळा असतो. सुंदर चित्र काढल्यावर ,आनंदाने इतरांना दाखवल्यावर ,त्या मुलाचे सर्व जण कौतुक करतात .तेव्हा त्याला आयुष्यातले खूप काही साध्य केल्याचा आनंद होतो . तो शब्दात मांडता येणारा नाही. नृत्य सादर केल्यावर कमावलेल्या टाळ्या आणि गाणं गायल्यानंतर प्रेक्षकांची वाहवा ही आभाळाएवढ्या यशाची अनुभूती देते .कला आपल्याला आत्मविश्वास देते ,जगायला बळ देते ,एकांतात मित्र बनते, आणि न बोलणाऱ्याला बोलत करते.
काय आहे कला तणाव विसरायला लावणारा राजमार्ग आहे कला. दुसऱ्यांना आनंद देत स्वतः आनंदी होता येते ते फक्त आणि फक्त कलेमध्ये. मुलांच्या सृजन शीलतेचा विकास हा कलेमध्येच होतो.
मनातल्या कल्पनांना मूर्त रूप येते. नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा यातून निर्माण होते. येणाऱ्या समस्या आयुष्यातले प्रश्न सोडवण्यासाठी मुलगा तयार होतो, कारण कलेमुळे त्याला आत्मविश्वास आलेला असतो. कलाकार मुलगा इतरांपेक्षा वेगळा असतो. वेळेचे व्यवस्थापन करून खेळाबरोबर आराम आणि जोडीला कला असेल तर कोणताही मुलगा आयुष्यात निरस किंवा तणावात राहणार नाही .तोच तोपणा त्याच्याकडे कधीच येणार नाही. नकारात्मक विचारांना आयुष्यातच थारा मिळणार नाही. चित्रकला ,नृत्यकला, नाट्य, संगीत या कला कल्पनांना उत्तेजन देते .मुलांचे भाव विश्व वाढवते .मानसिक शांतता देते. नृत्यात रमलेली मुले चिंता आणि अडचणी विसरून जातात आणि एकाग्र होतात .
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये याच तर गोष्टींचा समावेश केलेला दिसतो .कलेमुळे होणारा मेंदूचा विकास आहे ,संशोधनातून मुलं मुलाच्या शारीरिक विकासाबरोबर मानसिक विकासासाठी कलेची गरज अद्वितीय मांनली गेली आहे. आजच्या स्पर्धा करणाऱ्या युगामध्ये टिकायचे असेल तर या स्पर्धेची स्पर्धा करण्यासाठी कलेची जोड नुसती गरजेची नाही तर अत्यावश्यक झाली आहे.
लेखन- सौ. शुभांगी पंकज बोबडे
उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती(टाकेवाडी) ता.माण जि. सातारा
छाया – सौ.शुभागी बोबडे