मोटरमनने दुरूनच धोका ओळखला, हजारो प्रवाशांचे प्राण वाचले; कुर्डुवाडीमध्ये भयंकर प्रकार

0

पंढरपूर : रेल्वे रुळावर मोठे दगड, सिलिंडर किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांना अपघात होईल अशा वस्तू ठेवण्याच्या गटना देशात वाढीस लागल्या आहेत. कुर्डुवाडीमध्येही अशीच एक घटना घडली आहे.
माढा तालुक्यातील कुर्डुवाडी रेल्वे जंक्शनपासून जवळच रेल्वे रुळावर सिमेंटचा स्लिपर ठेवण्यात आला होता. सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला आहे. इतकंच नाही तर अज्ञातांनी कपलिंकमध्ये दगडही ठेवले होते असे दिसून आले आहे. लोको पायलट रियाज शेख यांच्या सतर्कतेमुळे घातपाताची घटना टळली आहे. बुधवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी रात्री 8.15 च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती मिळाली आहे.

रेल्वे ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी एक विशेष गाडी असते. या गाडीला टॉवर वॅगन म्हणतात. ही वॅगन मलिकपेठहून कुर्डुवाडीकडे येत होती. कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर सिग्नल पॉईंटजवळ रेल्वे रुळावर काहीतरी असल्याचे या गाडीचे मोटरमन शेख यांना दिसून आले होते. त्यांनी गाडी थांबवून उतरून पाहिले असता त्यांना दिसले की कोणीतरी रुळावर लोको पायलट व गार्ड यांना सूचना देणारा फॉलोईंग मार्कचा स्लिपर ठेवला आहे. शेख आणि त्यांचे सहकारी जे ई उमेश ब्रदर यांनी तत्काळ ही माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांनी पोलीस अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सव्वा आठच्या सुमारास इंजिनिअरिंग कंट्रोल रुमला रुळावर सिमेंटचा स्लीपर ठेवला असल्याची माहिती मिळाली होती. ट्रॅकमन, रेल्वेचे सहाय्यक पोलिस उप निरीक्षक राऊत ,रेल्वे सुरक्षा बलाचे सी.टी. प्रदीपकुमार व पॉईंटसमन सातपुते व पॉईटसमन तुपे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि या सगळ्यांनी मिळून हा स्लिपर रुळावरून बाजूला केला. अवघ्या काही मिनिटांमध्ये रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा करण्यात आला. जर या मार्गाने टॉवर वॅगन गेली नसती आणि मोटरमन शेख यांचे लक्ष गेले नसते तर मागून येणाऱ्या रेल्वेला मोठा अपघात झाला असता. जर रेल्वेच्या मोटरमनने हा सिमेंटचा स्लिपर पाहून गाडी थांबवली असती तर गाडी येण्याची वाट बघत दबा धरून बसत गाडीवर दरोडाही घालण्याची शक्यता होती. त्यामुळे लोको पायलट शेख यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here