राहुरी विद्यापीठ, दि. 17 ऑक्टोबर, 2022
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयाच्या डिजीटल
क्लासरुममध्ये नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या प्रंगणात झालेल्या पी.एम.
किसान सम्मान संमेलन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता
(निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार, अवजारे
प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित
खर्डे, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे उपस्थित होते.
यावेळी नवी दिल्ली येथे दि. 17 व 18 ऑक्टोबर, 2022 या दोन दिवसीय किसान
सम्मान संमेलनाचे उद्दघाटन प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री श्री. नरेंद्रसिंह तोमर, पर्यावरण व रसायन खते
केंद्रीय मंत्री श्री. मनसुख मालविय व केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री. कैलाश
चौधरी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पी.एम. किसान सम्मान निधीचा बाराव्या
हप्त्याचे शेतकर्यांच्या खात्यावर वितरण, देशभरातील 600 किसान समृध्दी केंद्रांचे उद्घाटन,
एक देश एक खत या योजनेचे तसेच कृषि स्टार्टअप प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी
केलेल्या उद्घाटनपर भाषणात श्री. नरेंद्र मोदी म्हणाले की कृषि क्षेत्रात नव्यानेच सुरु झालेल्या
स्टार्टअपच्या माध्यमातून देशाला तसेच कृषि क्षेत्राला समृध्द बनवायचे आहे. शेतामधील पिकांच्या
लागणीपासून शेतमाल काढणी तसेच विक्री करण्यापर्यंत सर्व कामात हे स्टार्टअप शेतकर्यांना
फायदेशीर ठरणार आहेत. आतापर्यंत खाद्यान्नाबरोबरच कृषि क्षेत्रासाठी लागणार्या खतांसाठी,
पेट्रोल डिजेलसाठी आपण दुसर्या देशांवर अवलंबुन राहिल्यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान
झाले आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी अविरतपणे केलेल्या संशोधनामुळे नॅनो युरीया तसेच इथेनॉलचा
वापर शेतीमध्ये तसेच इंधन म्हणुन केल्यामुळे खतावरील तसेच इंधनावरील खर्च होणारे करोडो
रुपये वाचणार आहेत. त्याचबरोबर शेतकर्यांची वाढीव खर्च तसेच कष्टांपासून बचत होणार आहे.
देशभरातील तीन लाखापेक्षा जास्त शेतीसंबंधी साहित्य विकणार्या दुकानांचे पी.एम. किसान
समृध्दी केंद्रात परिवर्तन होणार आहे. या केंद्रामध्ये एकाच छताखाली शेतकर्यांना लागणार्या
सर्व निविष्ठा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशात भारत ब्रँड खतांची विक्री होणार
आहे. कृषि क्षेत्रातील स्टार्टअपमुळे शेतकर्यांचे जीवन सोपे होणार आहे. अशा प्रकारे शेतीमध्ये
देशाने आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प केला असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमासाठी
विद्यापीठातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले.