लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

0

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेमचेंजर ठरली. महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता उर्वरित लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा झाले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेची घोषणा करुन महिलांचे अर्ज मंजूर केले. यातील काही अर्जांमध्ये त्रुटी असूनही पडताळणी न करता त्या महिलांना पैसे देण्यात आले. मात्र आता निकालानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहेत. तसेच ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत ते अर्ज बाद केले जातील, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे ज्या पात्र महिलांचे अर्ज बाद होतील, त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत, असे बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली, तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले. आता लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

“महायुतीचा प्रचंड मोठा विजय”

“विधानसभा निवडणुकांच्या काळात मी अंबाबाईचे दर्शन घेतले होते. महायुतीच्या विजयानंतर आम्ही अंबाबाईचे दर्शन घ्यायला नक्की येऊ असे मी सांगितले होते. अंबाबाईच्या कृपेने अद्भूत यश महायुतीला मिळाले. सरकार आल्यानंतर अनेक बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरु केले. तर दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना पुन्हा सुरु केल्या. एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सांगड घातली. त्यामुळे महायुतीचा प्रचंड मोठा विजय झाला”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत राहिल”

“ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी ही योजना अशीच सुरु राहणार आहे. त्यात अजिबात खंड पडणार नाही. त्यांना दर महिन्याला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत राहिल”, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.

“आता काहीही कामधंदा उरलेले नाही”

“जेव्हा त्यांना विजय मिळतो, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, निवडणूक आयोग चांगलं असतं. तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टही चांगलं असतं. पण जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएममध्ये दोष, याद्यांमध्ये दोष, निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप दुसरं त्यांना काही धंदा उरलेला नाही. त्यांना आता काहीही कामधंदा उरलेले नाही. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यासाठी जेवढे आमदार लागतात, तेवढेही ते मिळवू शकले नाहीत. यावरुन महाराष्ट्रातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे”, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here