जत दि.1(प्रतिनिधी)* लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे विचार समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणारे आहेत. समाज व राष्ट्र विकसित झाले पाहिजे म्हणून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या साहित्याचा अभ्यास आजच्या तरुण पिढीने केला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.रामदास बनसोडे यांनी केले.
ते राजे रामराव महाविदयालय, जत येथे मराठी विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा.कुमार इंगळे हे होते. यावेळी प्रा.सागर सन्नके, डॉ.ज्ञानेश्वर कांबळे व प्राध्यापिका रेश्मा लवटे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ.रामदास बनसोडे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांचे योगदान महत्वाचे आहे तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याचे योगदान महत्त्वाचे आहे असे सांगून डॉ.रामदास बनसोडे यांनी आपल्या भाषणातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रवासाचा आणि लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचा आढावा घेतला.
यावेळी प्रा.सागर सन्नके यांनी जीवनात शॉर्टकट कधिच शोधायचा नसतो कारण शॉर्टकट फार काळ टिकत नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी शॉर्टकटच्या मागे न लागता परिक्षम करून यश मिळविले पाहिजे हे “स्मशानातील सोनं” या कथेचा धागा पकडून सांगितले. यावेळी कु.अंकिता व्हणखंडे हिने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या “स्मशानातील सोनं” या कथेचे मधुर आवाजात वाचन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रारंभी मराठी विभाग प्रा.कुमार इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी तर शेवटी आभार प्राध्यापिका रेश्मा लवटे यांनी मानले.