हडपसर/पुणे 12 सप्टेंबर 2023
प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे एस.एम. जोशी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष कला या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस. गायकवाड साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अभिभाषणात ते म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या योगदानामुळे महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने शैक्षणिक क्रांती झाली. यामध्ये लक्ष्मीबाईंचा सिंहाचा वाटा होता. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने वाटचाल करावी. जर विद्यार्थ्यांना काही समस्या असतील तर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे कार्य करावे. विद्यार्थ्यांची पदवी अभ्यासक्रमाची तीन वर्ष त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे काम करणारी असतात. या तीन वर्षात विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून स्वतःचे भविष्य उज्वल करावे. विद्यार्थ्यांनी स्वतः मधील सुप्त गुण लक्षात घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रातील करिअरच्या संधी शोधून त्या दिशेने प्रयत्नपूर्वक वाटचाल करावी. जीवनामध्ये यश मिळवणे सोपे आहे. पण मिळालेले यश टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील संवाद कौशल्य विकसित करावे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये निर्णय क्षमता विकसित करण्यासाठी प्राध्यापकांनी मेहनत घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पदवीच्या तीन वर्षात आपल्या आवडीच्या सांस्कृतिक, क्रीडा किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये करिअर करावे. तसेच चांगला नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी स्वयंविकासाबरोबरच राष्ट्र विकासाचे ध्येय उराशी बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी केले. .
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपप्राचार्य डॉ. संजय जगताप यांनी विद्यापीठाची परीक्षा पद्धती व क्रेडिट पॉईंट पद्धती याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, कला शाखाप्रमुख डॉ.दिनकर मुरकुटे, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. एकनाथ मुंढे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरोज पांढरबळे व मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. महेश देवकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. एकनाथ मुंढे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार इंग्रजी विभागप्रमुख डॉ.शहाजी करांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नम्रता कदम यांनी केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.