शिवसैनिकांचा अभिमान असल्याचा खोटा पुळका दाखवू नका – कैलास जाधव

0

आमदार काळे यांना जाधव यांचे खडेबोल 

 कोपरगाव- दि. १६ ऑक्टोंबर २०२२

            नुकतेच कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी शिवसैनिकांचा सार्थ अभिमान अशी बातमी देऊन आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत शिवसैनिकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्यावर शिवसेनेत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून ज्यांनी स्वतः शिवसेना संपवण्याचा प्रयत्न कोपरगावमध्ये केला त्या आमदार आशुतोष काळे यांनी शिवसेनेच्या आडून मतांचे राजकारण साधू नये अशी टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

            जेव्हा अडीच वर्षे शिवसेना सत्तेत सोबत असतांना राष्ट्रवादीचे आमदार काळे यांनी एकदाही शिवसैनिकांना कधी बैठकींना बोलवले नाही किंवा कधी विश्वासात घेऊन काही समन्वय ठेवला नाही,या उलट राष्ट्रवादीला एक हाती सत्ता मागण्याचा प्रचार काळेंनी कायम ठेवला.शिवसेनेसोबत सत्तेत राहून मिळालेला निधी स्वतःच्या नावाने खपवून शिवसैनिकांना केवळ गृहीत धरून कारभार हाकला गेला ही वस्तुस्थिती आहे.सत्ता गेल्यानंतर आपल्या जाहिरातीत केवळ राष्ट्रवादीचा प्रचार करून माजी मुख्यमंत्री महोदयांचा फोटो वापरणे टाळले यातच काळेंची भूमिका काय आहे हे शिवसैनिकांना लक्षात आले आहे.

           या पुर्वीही कधीही काळे यांनी हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला काही कार्यक्रम घेतला नाही,या उलट कुठेही अभिवादन करण्यासाठी आले नाहीत यावरूनच शिवसेनेचे किती प्रेम यांना आहे हे दिसून येते.केवळ ठाकरे कुटूंबाचे फोटो वापरून सत्तेचा फायदा घेण्यात आमदार आशुतोष काळे मश्गुल होते व शिवसैनिक आपसात कसे झुंजत राहतील यावर लक्ष ठेवून होते.

           एकीकडे शिवसैनिक नगरसेवक अपात्र होण्यासाठी नगरपालिका प्रशासनावर दबाव आणला व त्या नगरसेवकांना जास्त त्रास कसा होईल यासाठी आपली शक्ती आमदार काळे खर्च करतांना दिसले.प्रशासनात वर पासून खाल पर्यंत आमदार काळे यांनी फोन करून कोपरगावच्या शिवसैनिकांना त्रास दिला ही जखम ताजी असतांना काळेंनी शिवसैनिकांचा अभिमान असल्याचे दुटप्पी वक्तव्य करणे म्हणजे सौ चुहे खाकर बिल्ली चली स्वर्ग को अशी गत आहे.

            माजी आमदार अशोकराव काळे यांनी शिवसेना व मातोश्री बद्दल कोणत्या शब्दात टिपण्या केल्या होत्या हे आम्ही कदापि विसरणार नाही,शिवसेनेने दोन वेळा काळे कुटूंबाला आमदारकी मिळवून दिली पण स्वार्थासाठी काळेंनी त्यावेळी शिवसैनिकांचा विश्वासघात करून पक्ष सोडला.एवढे वर्ष पक्ष सोडल्यानंतर यांना कधीही शिवसैनिक आठवला नाही मात्र आता भविष्यात येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत मतांची गोळाबेरीज हिशोबात घेऊन आमदार काळेंनी केलेले वक्तव्य म्हणजे ” राजकारणासाठी काही पण “अशी अवस्था आहे.

             कोरोना काळात रिक्षाचालक सैनिकांकडे साफ दुर्लक्ष केले,एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना बसस्थानका जवळून जातांना त्या कर्मचारी सैनिकांना साधी भेट देऊन समस्या जाणून घ्यावी वाटली नाही या उलट शेजारी जेसीबी ने गुलाल उधळून घेत त्या एस टी कर्मचारी सैनिकांच्या जखमेवर मीठ चोळले हे कोणताही शिवसैनिक विसरलेला नाही.शिवसैनिक आपल्या मेहनतीने कष्ट करून उदरनिर्वाह करत असतो त्या ठिकाणीही प्रशासनाला हाताशी धरून त्यांच्या उद्योग धंद्यावर वरवंटा फिरवण्याचे काम केले हे शिवसैनिक कधीही विसरणार नाही असेही उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव शेवटी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here