बीजिंग : चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांना कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीतून बाहेर काढण्यात आल्याचं फुटेज समोर आलं आहे. गेल्या आठवड्यात बीजिंगमध्ये कम्युनिस्ट पक्षाचं अधिवेशन झालं. या अधिवेशनातलंच हे फुटेज आहे.
पॉलिट ब्यूरोमधून बाहेर पडलेले सदस्य ली जंशु हे जिंताओ यांच्याकडून एक फाइल घेताना आणि त्यांच्याशी बोलताना या व्हीडिओत दिसतात. त्याच व्हीडिओत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दुसऱ्या एका व्यक्तीला काहीतरी सांगतात आणि त्यानंतर ती व्यक्ती हू यांना बाहेर जायला सांगते.
या अचानक झालेल्या कृतीमुळे अनेक शंका निर्माण झाल्या. हू यांचा काळ आता मागे पडला असल्याचंच जिनपिंग यांना दाखवून द्यायचं असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांच्या मते हू यांच्या नाजूक प्रकृतीमुळे त्यांना बाहेर जायला सांगितलं गेलं, असू शकतं.
सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने नंतर एक ट्वीट करून स्पष्ट केलं-जिंताओ यांना बाहेर नेण्यात आलं कारण त्यांना बरं वाटत नव्हतं. अर्थात, ही माहिती चीनमध्ये देण्यात आली नाहीये. ट्विटरच्या वापरावर चीनमध्ये बंदी आहे.
हा सर्व प्रसंग जिनपिंग आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या तिसऱ्या कार्यकाळाची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी घडला होता. त्यामुळेच हे टायमिंग आणि चीनमधील अपारदर्शक व्यवस्था यांमुळे जगभरात या प्रसंगावरून तर्क वितर्क केले जाता आहेत.
राजकीय ड्रामा?
हा एक जाणूनबुजून केलेला राजकीय ड्रामा होता, असं काही लोकांचं म्हणणं आहे.
हू जिंताओ हे 2003 ते 2013 या काळात चीनचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या काळात बाहेरच्या जगासाठी चीनचे दरवाजे खुले व्हायला लागले होते. पण जिनपिंग यांचा काळ वेगळा आहे.
हू यांना बाहेर काढण्यात आल्याचं नवीन फुटेज हे सिंगापूरचं चॅनेल न्यूज एशियाने प्रसिद्ध केलं आहे. हे फुटेज पाहिल्यावर जिंताओ यांची प्रकृती ठीक नसल्यामध्ये तथ्य नाही असं नाही. पण मग त्यांच्या समोर ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांचं काय? त्याच्याशी या घटनेचा काय संबंध होता?
फुटेजमध्ये ली जंशु हे जिंताओ यांना हात देण्यासाठी उभे राहताना दिसतात. मात्र त्यानंतर वांग हूनिंग त्यांना त्यांच्या जागेवर पुन्हा बसायला सांगतात. जिंताओ जिनपिंग यांना काहीतरी सांगतात, ज्याकडे शी जिनपिंग अजिबात लक्ष देत नाहीत आणि मग जिंताओ यांना बाहेर नेलं जातं. आजूबाजूला बसलेले लोक त्यांच्याकडे पाहतही नाहीत.
कम्युनिस्ट पक्षाचं वर्तमानपत्र संडे टाइम्सचे माजी संपादक डेंग युवेन सांगतात की, जिंताओ यांना वाचण्याची परवानगी नाही असे कोणतेही कागदपत्र तिथे असतील असं मला तरी वाटत नाही. अशाप्रकारच्या महत्त्वपूर्ण बैठकीत असं काही घडणं शक्यच नाही. कारण सगळीकडे कॅमेऱ्याची नजर असते. ते सांगतात, “ही विचित्र गोष्ट होती. त्या फाइलमध्ये नेमकं काय होतं आणि तिथे काय चर्चा झाली याचे पुरावे जोपर्यंत समोर येत नाहीत, तोपर्यंत नेमकं काय घडलं हे कोणालाच कळणार नाही.”
ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या वेन-सी सुंग सांगतात की, नवीन फुटेजमधून सगळं काही नीट लक्षात येत नाहीये. त्या म्हणतात, “चीनमध्ये सगळं काही रीतसर होतं. खासकरून जेव्हा असे हाय प्रोफाईल इव्हेंट असतात. जिनपिंग यांच्या शासन काळात सगळं काही कंट्रोलवर अवलंबून असतं.”