संगमनेर : स्वातंत्र्यसैनिक,सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त शुक्रवारी राजस्थानचे मुख्यमंत्री ना.अशोक गेहलोत संगमनेरात येणार असून त्यांच्या शुभहस्ते डॉ.अण्णासाहेब साळुंखे,दिलीपराव देशमुख, आणि डॉ.सुधीर भोंगळे यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
शुक्रवार (दि.२३) सप्टेंबर दुपारी १२:३० वाजता यशोधन कार्यालया शेजारील शेतकी संघाच्या प्रांगणात संगमनेरच्या सहकार पंढरीचे जनक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त प्रेरणा दिन व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यंदा सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण व माध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार थोर विचारवंत डॉ.अण्णासाहेब हरी साळुंखे यांना तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील नेतृत्व पुरस्कार लातूरच्या मांजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव दगडोजीराव देशमुख यांना दिला जाणार असून कृषी,शिक्षण,समाजसेवा,पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ तथा वनराईचे विश्वस्त डॉ.सुधीर जगन्नाथ भोंगळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा राज्याचे माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री आ.छगन भुजबळ भूषवणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ.सुधीर तांबे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, पुरस्कार निवड समितीचे सदस्य विजय अण्णा बोराडे, प्रख्यात सर्जन डॉ.राजीव शिंदे, पुण्याच्या अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर, महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते, प्राचार्य केशव जाधव, प्रा.बाबा खरात यांच्यासह जयंती महोत्सव संयोजन समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.