सोलापूर, उत्तम बागल : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ई केवायसी प्रक्रिया करून घेण्याविषयी शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अद्याप २८ टक्के शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नाही. कृषी आयुक्त स्तरावरून दिलेल्या सूचनेनुसार आधार कार्डशी ई केवायसी करण्याची मुदत १४ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
ई केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी आधार क्रमांकाला ई केवायसी करून घ्यावी, अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. १२ वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी १४ सप्टेंबर २०२२ पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
<p>आतापर्यंत ४ लाख ३१ हजार ६८४ शेतकऱ्यांचे ई केवायसी झाले आहे. अजून १ लाख ७० हजार ८७६ शेतकरी ई केवायसी करायचे राहिले आहेत. ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील सीएससी सेंटर, आपले सेवा केंद्रामध्ये जावून किंवा शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईलवर ई-केवायसी करावी.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार योजनेतील लाभार्थ्यांचा डाटा अंतिम व सुनिश्चित करण्याची कार्यवाही विहित कालमर्यादेत पूर्ण करायची आहे. सर्व पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावातील किंवा जवळील सीएससी सेंटर, आपले सेवा केंद्र किंवा स्वत:च्या मोबाईलवर ई-केवायसी करावी, असे आवाहनही शंभरकर यांनी केले आहे.