उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )
दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी उरण पूर्व विभागातील तरुणांसाठी श्रीया फाऊंडेशन पाले व कॉमन सर्विस सेंटर (CSC) यांच्या वतीने सरकारी नोकरी, पोलीस भरती आणि सरळ सेवा भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आठ देशामध्ये भारताचे अँथलेटिक्स मध्ये प्रतिनिधित्व केलेले व शिक्षा फाऊंडेशन चे संस्थापक प्रशांत पाटील, निवृत्त पोलीस सबइन्स्पेक्टर चंद्रकांत म्हात्रे, निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोसुराम म्हात्रे आणि श्रीकांत म्हात्रे, श्रीया फाऊंडेशन पाले अध्यक्षा स्मिता म्हात्रे, प्रसिद्ध निवेदक व क्रिकेट समालोचक सुनील वर्तक, आगरी कोळी कराडी उद्योजक असोसिएशन (AKKUA) चे राहुल ठाकूर, दिपिका ठाकूर, संदीप म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा स्मिता म्हात्रे यांनी सांगितले की, आमचा पूर्व विभाग सुशिक्षित आहे परंतु शिक्षण क्षमता असून सुद्धा गोडाऊनच्या खाजगी नोकरी मध्ये अडकला आहे. दहावी वाला पण तीच नोकरी करतो. जो ग्रॅज्युएशन,एम.ए. झालेला आहे तो सुद्धा तिच नोकरी करतो. कारण काय तर रोजची कमाई आणि घराजवळ नोकरी. तरुणांनी विचार बदलला तर परिस्थिती निश्चित बदलेल असा आशावाद त्यांनी केला. तर प्रसिद्ध अँथलेटिक्स प्रशांत पाटील यांनी सरकारी नोकरी, पोलिस भरती व सरळसेवा भरती याबाबत मार्गदर्शन केले. आपल्या विभागात तरुण सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी स्थानिक प्रकल्पात अधिकारी का होत नाहीत त्यासाठी शिक्षा फाऊंडेशन तर्फे निश्चित प्रयत्न मार्गदर्शन केले जाईल असे ते म्हणाले. तर पोलीस भरती वेळी आपल्याकडे कोणते कौशल्य पाहिजे शारीरिक क्षमता कशी पाहिजे याबाबत सखोल मार्गदर्शन प्रात्यक्षिकासहित श्रीकांत म्हात्रे यांनी केले. यावेळी पोलीस सबइन्स्पेक्टर चंद्रकांत म्हात्रे व सहा पोलीस उपनिरीक्षक पोसुराम म्हात्रे यांनी उपस्थित तरुण व पालकांना जास्तीत जास्त सरकारी नोकरी व पोलीस भरती साठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. तर सुनील वर्तक व संदीप म्हात्रे यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मिलींद म्हात्रे व दिपिका ठाकूर यांनी केले व कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन रमाकांत म्हात्रे, विनोद म्हात्रे, राजेश म्हात्रे, प्रितम म्हात्रे, अक्षय म्हात्रे व मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले.