संगमनेर-अकोल्यात झालेल्या धुव्वाधार पावसाने ओझर बंधारा ओव्हर फ्लो ; २२,१५१ क्युसेसने प्रवरापात्रात विसर्ग सुरू

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील :

भंडारदरा-निळवंडे पाणलोट क्षेत्रात सुरू असणाऱ्या धुव्वाधार पावसाने प्रवरा नदीला पूर आला असून प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यातच भंडारदरा-निळवंडे-आढळा आणि वाकी धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग प्रवरा पात्रात सुरू असल्याने संगमनेर तालुक्यातील ओझर बंधारा ओव्हरफ्लो झाला असून बंधाऱ्याच्या भिंतीवरून सुमारे २२,१५१ क्युसेसने बंधाऱ्याच्या पूर्व बाजूला असणाऱ्या प्रवरापात्रात विसर्ग सुरू होता. दरम्यान ओझर बंधाऱ्याचे दोन्हीही कालवे बंद असल्याने पुराचे हे पाणी बंधाऱ्याच्या पश्चिमेला असणाऱ्या शेतात घुसल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

       <p>  गत आठ दिवसापासून संगमनेर-अकोले तालुक्यात वरूण राजाने कृपादृष्टी करत शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यातच भंडारदरा-निळवंडे- आढळा आणि वाकी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने प्रवरा नदीला पूर आला असून संगमनेरच्या पश्चिमेला असणाऱ्या धांदरफळ बुद्रुक आणि धांदरफळ खुर्द या दोन गावांना जोडणारा प्रवरा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. काल शनिवार (दि.१७) सप्टेंबर सकाळी सहा वाजेच्या आकडेवारीनुसार भंडारदरा धरणातून २०३२, निळवंडे धरणातून १२,८८४, आढळा धरणातून ३५१२ तर वाकी धरणातून ७८९ क्युसेस पाण्याचा विसर्ग प्रवरापात्रात सुरू होता. त्यातच अकोले आणि संगमनेर तालुक्यात झालेल्या पावसाचे पाणी ही प्रवरापात्रात येत असल्याने प्रवरा नदीला मोठा पूर आला असून तालुक्यातील ओझर बंधारा ओव्हर फ्लो झाला असून बंधाऱ्याच्या भिंतीवरून २२,१५१ क्युसेसने भिंतीच्या पूर्व बाजूला असणाऱ्या प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू होता. 

        प्रवरा नदीला एवढा मोठा पूर आलेला असताना सुद्धा ओझर बंधाऱ्या नजीक असणारे प्रवरा उजवा व प्रवरा डावा हे दोन्हीही कालवे गत पंधरा दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे पुराचे हे पाणी ओझर बंधाऱ्याच्या पश्चिमेला असणाऱ्या रहिमपूर, कनोली, जोवेॅ आदी गावातील नदीकाठच्या शेतात शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होणार असून या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी या परिसरातील शेतकरी वर्गांने केली आहे. प्रवरा डावा व प्रवरा उजवा कालव्याअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांची पाण्याची मागणी नसल्याने हे दोन्हीही कालवे बंद ठेवण्यात आल्याचे पाटबंधारे कर्मचाऱ्यांनी सांगितले असले तरी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या नुकसानीला जबाबदार कोण ? असा प्रश्न आता संतप्त शेतकरी विचारू लागले आहेत. प्रवरा डावा आणि उजवा कालवा चालू केला असता तर काही प्रमाणात का होईना वरील गावातील शेतकऱ्यांच्या शेतात गेलेले पाणी किमान निघून गेले असते असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान प्रवरेचा पूर आणि वरूणराजाची या भागात दररोज होणारी जोरदार एंन्ट्री यामुळे या परिसरातील बळीराजा हवालदिल झाला आहे.

चौकट :- फक्त पाऊसच

(१) – भंडारदरा ११७ मि.मी, (२) घाटघर १२७ मि.मी, (३)पांजरे ९८ मि.मी,(४) रतनवाडी १३४ मि.मी,(५) वाकी ९५ मि.मी,(६) निळवंडे ७३ मि.मी, (७)आढळा ६५ मि.मी,(८) अकोले ७९ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. (सदर आकडेवारी शनिवार (दि.१७) सप्टेंबर रोजी सकाळी सहावाजेची आहे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here