संगमनेर बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण ; संतप्त शेतकऱ्यांचे दोन तास गेट बंद आंदोलन

0

         

संगमनेर : पिकअप गाडी पुढे मागे घेण्याच्या कारणावरून तालुक्यातील रणखांब येथील एका शेतकऱ्याला काल बुधवारी बाजार समितीतील व्यापाऱ्याच्या एका नातेवाईकाने मारहाण केल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे मेन गेट बंद करून दोन तास आंदोलन केले. या आंदोलनामुळे बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 

         तालुक्यातील रणखांब येथील शेतकरी किरण बारवे यांना बाजार समितीमधील एका व्यापाराचा नातेवाईक असलेल्या अरबाल पठाण याने पिकअप गाडी मागे पुढे घेण्याचा कारणावरून मारहाण केली. ही बातमी बाजार समितीत उपस्थित असलेल्या इतर शेतकऱ्यांना समजल्यावर संतप्त शेतकऱ्यांनी दोन तास बाजार समितीचे मेन गेट बंद करत आंदोलन केले. जोपर्यंत  व्यापाऱ्याचा नातेवाईक असलेल्या अरबाल पठाण याला अटक केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. या दरम्यान शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना शिवसेनेचे शहर प्रमुख प्रसाद पवार यांना कळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि व्यापाऱ्यांना जाब विचारला. शिवसेनेचे कार्यकर्ते गुलाब भोसले, रणजीत ढेरंगे यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. मारहाण करणाऱ्या अरबाल पठाण वर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. यादरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, उपनिरीक्षक निवांत जाधव, उपनिरीक्षक पारधी, राजेश गायकवाड, बाळासाहेब यादव, सचिन उगले, राजेंद्र डोंगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करत अरबाल पठाण नामक व्यक्तीचा शोध सुरू केला. संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विनापरवाना व्यापारी माल भरत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळी केला. त्यामुळे लवकरच शेतकरी आणि व्यापाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिले. या आंदोलनामुळे दोन तास शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. बाजार समितीच्या मेन गेटवरच आंदोलन झाल्यामुळे तालुक्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाच्या गाड्या बराच वेळ गेट वरच उभ्या होत्या.  अखेर शहर पोलिसांनी पठाण याच्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा शोध सुरू केला. आणि त्याला लवकर अटक केली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here