८ ऑक्टोंबरला रात्री संगमनेर येथे श्री. बाळासाहेब थोरात यांच्या संस्थेच्या गेस्टहाऊसमध्ये मुक्कामाला होतो. बाळासाहेबांचे पिताश्री क्रांतिवीर भाऊसाहेब थोरात यांनी हे गेस्टहाऊस अशा उंच टेकडीवर बांधले आहे की, तिथून सगळे संगमनेर दिसते. पोहोचायला संध्याकाळ झाली. दक्षिणायन सुरू असल्यामुळे लवकर काळोख होतो. गेस्टहाऊसच्या बाहेर एक छान व्हरांडा आहे. त्या व्हरांड्यात बसले की, अख्खे आकाश नजरेच्या कवेत येते. त्यात कोजागिरी पौर्णिमा रविवारी (९ ऑक्टोंबर ) होती. मुंबईत ढगांनी चंद्राला झाकून टाकले होते तरी संगमनेरमध्ये पौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा चंद्र असा डोळ्यांसमोर आला होता. त्या चांदण्यात संगमनेर न्हाऊन निघाले होते.
खूप दूरपर्यंत शहर दिसत होते. एकेकाळी संगमनेर दुष्काळी तालुका होता. आजही पाऊस पुरेसा पडत नाही. पण, ५० वर्षांपूर्वीचे संगमनेर आणि आजचे संगमनेर वेगळे आहे. विचार आणि विकासाचा ध्यास असलेल्या नेत्यांच्या अफाट कार्यशक्तीवर हा बदल घडला आहे. एक दुष्काळी गाव कुठे जावू शकते. सूर्य उजाडताच जिथून हजार माणसं संगमनेरच्या बाहेर ‘रोजगार शोधायला’ जात होती आज त्याच संगमनेरमध्ये आज हजारो माणसांना रोजगार मिळाला आहे . कारखाना उभा राहिला, अभियांत्रिकी महाविद्यालय इतक्या दर्जेदार पद्धतीने उभे राहिले की, देशात त्याचा सातवा क्रमांक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात कमी गायी आहेत. पण दुधाचे सर्वात जास्त संकलन अहमदनगर जिल्ह्यात होते. आणि त्यातही संगमनेर तालुक्यात जास्त होते. त्यामुळेच भाऊसाहेब थोरात आणि नंतर बाळासाहेब थोरात यांचा सहकारी दुग्धप्रकल्प… राजहंस… हजारो लोकांना रोजगार देवून गेला. हे दूध मुंबई-पुण्याला जाते. आणि या दुधाचे उपपदार्थ खरेदी करून अनेकजण आपले छोटे-मोठे व्यवसाय चालवतात. कारखान्यामध्ये पाच हजार लोकांना रोजगार मिळाला.
अभियांत्रिकी महाविद्यालयात १५०० विद्यार्थी, १०० प्राध्यापक, १०० महाविद्यालयीन कर्मचारी… अशा अनेकांना प्रतिष्ठित शिक्षणसेवेत आपले काम करता आले. बघता – बघता संगमनेरचे रूप पालटून गेले. हे जसे श्रमाने झाले… मेहनतीने झाले… तसे राजकीय विचाराला विकासाची जोड मिळाल्यामुळे झाले. ही सगळी कर्तबगारी भाऊसाहेब थोरात यांची आहे. नवीन पिढीला हे काहीही माहिती नाही. महाराष्ट्राचे सोडून द्या… संगमनेरमधील तरुणांनासुद्धा भाऊसाहेबांचा त्यागही माहिती नाही… दूरदृष्टी माहिती नाही… विकासाची झेपही माहिती नाही… संगमनेरच्या ‘अमृतकुटी’कडे प्रवेश करताना जवळजवळ एक हजार फूटांचा उंच चढाव आहे. टेकडीवर गेस्टहाऊस आहे. तिथे पोहोचेपर्यंत बांबूच्या वनातून आपण जात आहोत… छान चांदणे पडलेय आणि दोन्ही बाजूंना कमान केलेले बांबू स्वागताला आहेत…. आज वर्षानुवर्षे हे बांबू टिकून आहेत… अनेक गेस्टहाऊस महाराष्ट्रात आहेत… अनेक संस्था आहेत… पण या गेस्टहाऊसवर जाताना ‘बांबूचे वन’ उभं करावं आणि ते बाकदार करावं… ही दृष्टी भाऊसाहेबांची… शिवाय टिकावू बांबू कुठे मिळतील, याचा अभ्यास करून भाऊसाहेबांनी हे बांबूवन उभे केले.
१९८० साली भाऊसाहेब हे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. देशातील सहकारी बँकांची एक परिषद मेघालयात होती. तिथं गेल्यावर भाऊसाहेबांनी हे बांबू पाहिले आणि हजारो बांबूंची खरेदी करून हे बांबू ४० वर्षांपूर्वी संगमनेरमध्ये आणून त्यातून ही ‘बांबूंची कमान’ तयार झाली . माणूस किती कलात्मक असू शकतो. ते या वनातून जाताना जाणवते. त्याचा प्रत्यय या गेस्टहाऊसमध्ये गेल्याशिवाय येणार नाही. साहित्यातून आनंद मिळतो. पण निसर्गाचा आनंद कसा घ्यायचा, हा विचार ज्याच्या मनात येतो तोही मनाने, विचाराने केवढा मोठा साहित्यतिक असला पाहिजे. मुळात, अशा उंच टेकडीवर गेस्टहाऊस बांधायचे, आणि तेही अगदी साधे…. पण देखणे… अख्ख संगमनेर नजरेच्या कवेत घेता येईल, अशी जागा निवडणे…. सगळंच काही विलक्षण आहे. त्याचा अनुभव अनेकवर्षे मी घेतो आहे. तिथूनच दिसणारा भाऊसाहेबांचा साखर कारखाना…. अभियांत्रिकी महाविद्यालय… राजहंस दुग्धप्रकल्प… आणि भाऊसाहेबांच्या नंतर बाळासाहेबांनी ही प्रत्येक संस्था दुप्पट, तिप्पट मोठी केली. भाऊसाहेब स्वातंत्र्यासाठी लढले. तीनवेळा तुरुंगात गेले. एकूण ४ ते ५ वर्षांची सक्तमजुरी भोगली. त्यांच्यासोबत आण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे हे बंधू, कॉम्रेड कडू-पाटील, दत्ता देशमुख, कॅाम्रेड भापकर ही सगळी त्यावेळी नगर जिल्ह्याची कम्युनिस्ट मंडळी होती. एका विचाराने भारलेली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांचा विचार सोडून दिला नाही. १९५० साली संगमनेर तालुक्यात एका शेतकरी परिषदेचे आयोजन केले. सावकार, गरीब शेतकऱ्याची लूट करत होते म्हणून संगमनेर तालुक्यातील खिरविरे येथील सावकाराच्या घरात घुसून गरीब शेतकऱ्यांना खोट्या कर्जात गुंतवणाऱ्या किर्द-खतावण्या चौकात आणून भाऊसाहेबांनी जाळून टाकल्या. त्यासाठी त्यांनी ६ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगली.
भाऊसाहेबांनी कर्ज घेतलेले नव्हते. लुबाडणूक शेतकऱ्याची झाली होती. आणि भाऊसाहेब त्याकरिता शिक्षा भोगत होते. १५ दिवस तर त्यांना नगरच्या पोलीस कोठडीत लादीवर झोपवण्यात आले. असे हे भाऊसाहेब…. क्रांतीच्या विचारांनी झपाटलेले. यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासात आले आणि वसंतदादांप्रमाणेच जीवनाचा सांधा बदलून त्यांनी झटकन विकासकामांत झोकून दिले. मग अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, संगमनेरच्या बहुजन विद्याप्रसारक मंडळाची स्थापना… संगमनेरभाग सहकारी साखर कारखान्याची उभारणी. १९७२ च्या दुष्काळाचा सामना… शेतकऱ्यांना मीटरप्रमाणे वीजबिल न आकारता हॅार्सपॉवरने ते बील आकारण्यासाठी-प्रति अश्वशक्ती १७० रुपयांचा भाव असावा… महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक निर्णय भाऊसाहेब थोरात यांनी िरझर्व्ह बँकेवर शेतकऱ्यांनी डोक्यावर वीज मीटर घेवून चालत काढलेल्या मोर्चाला आहे. त्याचे नेते भाऊसाहेब थोरात होते. महाराष्ट्राने एक इतिहास घडवला. नवीन पिढीला हे काही माहीती नाही. काही मिवळण्याकरिता त्या नेत्यांनी त्या काळात ही पळापळ केलेली नाही. जे कष्ट केले ते शेतकऱ्याचे जीवन समृद्ध होण्याकरिता.
आज संगमनेरची शेती दुबार पिकाची झाली. दुष्काळी संगमनेर आज सुजलाम झाला… भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या फेरवाटपाचा प्रश्न भाऊसाहेबांनीच लावून धरला. संगमनेर आणि अकोले तालुक्यासाठी ३० टक्के पाण्याचा हक्क भाऊसाहेबांनी मिळवून दिला. आज संगमनेरमधील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनासुद्धा याची मािहती नसेल.
भाऊसाहेबांचा हा विकासाचा आणि सामाजिक जीवनातील निष्ठापूर्वक काम करण्याचा वारसा, पदरात निखारा घेवून चालावे तेवढ्या जिद्दीने बाळासाहेबांनी चालवला आहे. म्हणून निळवंडे धरणाचा आज संगमनेर तालुक्याला जो फायदा मिळाला… शेतीला पाणी मिळाले… बाळासाहेबांनी आपले मंत्रीपद आणि त्यांच्याकडील खाती सामान्य माणसांच्या हितासाठी राबवली. कृषी असेल, महसूल असेल आणि सत्तेत नसतानाही सामान्य माणसांचे प्रश्न घेवूनच बाळासाहेब आज भाऊसाहेबांच्या पावलावर चालत आहेत. अनेक वर्षे सत्तेत राहून त्यांच्या पांढऱ्या स्वच्छ सदऱ्यावर एकही ओरखडा नाही.
संगमनेरच्या उजळलेल्या त्या रात्री मनात अनेक विचार येत होते. महाराष्ट्रातील अशी अनेक गावे आहेत… अनेक नेत्यांच्या अथक प्रयत्नाने ती स्वयंपूर्ण झाली. आज अकलूज असेल…. इस्लामपूर असेल…. संगमनेर असेल… वैद्यकीय मदतीसाठीसुद्धा (उच्चदर्जाची रुग्णालये) रुग्णाला मुंबई-पुण्याला न्यावे लागत नाही. कोणत्याही विद्याशाखेच्या उच्च शिक्षणाकरिता मुंबई-पुणे गाठावे लागत नाही. ग्रामीण भागातील हे परिवर्तन करणारी ती पिढी होती. त्यात वसंतदादा होते…. भाऊसाहेब थोरात होते. यशवंतराव मोहिते होते… खान्देशात मधुकरराव चौधरी होते. आणि प्रतिभाताई पाटील आजही आहेत. जयंतआप्पा होते…. वारणेचे तात्यासाहेब कोरे होते…. सा. रे. पाटील होते… आजही बाळासाहेब थोरात… जयंत पाटील… प्रकाश आवाडे … विनय कोरे… अशी पुढची पिढी त्याच ध्येयाने आणि निष्ठेने. सहकारावरील श्रद्धेने हे काम खूप पुढे नेत आहे. मनात एकच विचार येत राहतो की, नवीन पिढीला हे कोण सांगणार…. कसे समजणार? राजकारण म्हणजे सत्तेचा नुसता राडा नाही…. मेळाव्यांची स्पर्धा नाही… राजकारणातील समाजकारण… राजकारणातील सुसंस्कृतपण हे सगळे आज विलयाला चालले आहे. त्यामुळेच या जुन्या पिढीने जे घडवले, त्यासाठी आफाट कष्ट केले ते सगळे पुसून टाकून महाराष्ट्राला धटिंगण करण्याकडे महाराष्ट्रातील जे राज्यकर्ते निघाले आहेत…. ते उद्याचा महाराष्ट्र विद्रूप करून टाकतील, असेच भय वाटते.
संगमनेर सोडतना ५० वर्षांचा महाराष्ट्र असा डोळ्यांसमोर येत होता. आणि पुढच्या १०-२० वर्षांत महाराष्ट्रात आणखी काय धिंगाणे होतील, याचा अंदाजही करता येत नव्हता. ते पाहण्यापूर्वीच डोळे मिटले तर किती छान….!
– मधुकर भावे