संविधानिक मूल्यासाठी वैचारिक लढ्याची गरज:ॲड.असीम सरोदे

0

सातारा/अनिल वीर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला सर्वोत्तम असे संविधान दिले आहे. त्याच्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी फार मोठी वैचारिक लढाई करण्याची गरज आहे. असे मत संविधान विश्लेषक, प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.असीम सरोदे Adv. Asim Sarode यांनी व्यक्त केले.

 संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने ‘भारताचा अमृत काल ‘या विषयसूत्रावर आयोजित थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत ‘भारतीय संविधान व मानवी हक्क’ विषयावर ॲड.असीम सरोदे मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,”संविधान दिन प्रामुख्याने आंबेडकर अनुयायी साजरा करतात.तरीही सर्वच समाजाने साजरा केला पाहिजे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की,व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याची भक्ती/ पूजा करु नका.ते लोकशाहीला घातक आहे. व्यक्तीस्तोमामुळे हुकूमशाही प्रवृत्ती बळावते.मात्र, देशात आज तसेच घडते आहे. भारतीय संविधान उध्वस्त करण्याचे प्रयत्न होत आहेत. संविधानाने व्यक्ती व अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. स्वातंत्र्य चळवळीने दिलेला धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद व लोकशाही जिवंत ठेवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. समाजाचा बुद्धिजीवीवर्ग याबाबत उदासीन व वैफल्यग्रस्त झालेला आहे. हुकूमशाही प्रवृत्ती विरुद्ध बुद्धिजीवी वर्ग व समाजाने मायावी प्रयोगांना न भुलता निर्भयपणे उभे राहिले पाहिजे. दिखाऊ स्वरूपाचा राष्ट्रवाद व विषारी धर्मांधता याचा मुकाबला केला पाहिजे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. कट्टरतावाद हिंदू मुस्लिम कोणत्याही रंगाचा असला तरी त्याला कडाडून विरोध  केला पाहिजे. देव-धर्म आणि शहीद सैनिक यांच्या नावाने मतदान करावे. असे बेकायदेशीर आव्हान करणाऱ्या मोदी व शहा यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. कारण, भारताचा निवडणूक आयोग अर्धमेल्या ग्लानीग्रस्त अवस्थेत आहे. या देशात एक पंतप्रधान शीख समाजाचे तर एक राष्ट्रपती मुस्लिम अश्या अल्पसंख्याक समाजाचे झालेले असताना, ‘ हिंदू खतरेमे’ कसा काय असू शकतो ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. 

खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे एकदिलाने जीवन जगणाऱ्या हिंदू-मुस्लिम समाजात विष पसरविणारे हिंसक चेहरे ओळखण्याची ताकद नागरिकांना आत्मसात करावी लागेल.” लोकांप्रती संविधान समर्पित करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध महावीर यांचा अहिंसा शांततेचा व बंधुभाव प्रेमाचा विचार मानणारे म.गांधी यांची एकत्रित वैचारिक ताकदच कट्टरवादी हिंदुत्व, कट्टरवादी मुस्लिमवादीसह इतर धर्मांधांना थांबवून लोकशाहीला संविधानिक नैतिकता व लोकशाही जोपासण्याचे काम करील.असाही आशावाद शेवटी ॲड.असीम सरोदे यांनी व्यक्त केला.अध्यक्ष दिनकर झिंब्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले.प्रशांत साळवे यांनी सूत्रसंचालन केले तर ऍड.हौसेराव धुमाळ यांनी आभारप्रदर्शन केले.

        सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here