सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का; गोकुळ दूध संघाची ‘ही’ याचिका High Court ने फेटाळली

0

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चाचणी लेखापरीक्षणाला स्थगिती मिळावी, म्हणून संघाने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयानं (High Court) नुकतीच फेटाळून लावली.
              या निर्णयाने सत्ताधाऱ्यांना धक्का बसला असून संघाच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयानंतर संघाचे लेखापरीक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) सत्तांतर झाल्यानंतर अनेक प्रकरणांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक  यांनी केला होता. याच मुद्यावर संघाचे चाचणी लेखापरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली होती.
त्यानुसार शासनाने संघाचे चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देऊन त्याची जबाबदारी सोलापूरच्या उपनिबंधकांकडे दिली होती. पण लेखापरीक्षणासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना संघाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप झाला. त्यानंतर संघाने या लेखापरीक्षणाला स्थगिती मिळावी म्हणून थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने या कारवाईला खो बसला होता.
संघाने दाखल केलेल्या या याचिकेवर आज सुनावणी होऊन न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयाने संघाच्या लेखापरीक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून ही कारवाई तातडीने होण्यासाठी आता विरोधकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here