नागपूर : समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून येत्या नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे जाऊन चेकपोस्टवर पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी नागपूर विमानतळावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्याचे लोकार्पण दिवाळीत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे वृत्त होते. मात्र, आता पुढील महिन्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. आता लोकर्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आपले पोलीस जीव धोक्यात घालून काम करीत असतात. त्यातल्या त्यात गडचिरोली जिल्ह्यात काम करणाऱ्या पोलिसांच्या प्राणाला क्षणोक्षणी धोका असतो. त्यातही ते उत्तम काम करीत आहेत. आपण त्यांच्यासोबत सण साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते, लढण्याची उर्मी निर्माण होते. मी गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही दरवर्षी पोलिसांसोबत दिवाळी साजरी करीत होतो. आता मुख्यमंत्री आहे तरीही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. त्यांच्यासोबत आनंद वाटून घेण्यासाठी मी भामरागडला जात आहे. पोलिसांचे मनोबल वाढल्याने गडचिरोलीमध्ये नक्षलवाद कमी होत चालला असल्याचा दावाही त्यांनी केला.