स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाबंदी. 

0

फलटण प्रतिनिधी :  

                      बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, मा. खा. राजू शेट्टी यांना 30 एप्रिल पासून रत्नागिरी जिल्हाबंदी आदेश बजावण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिसाकडून त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. यामुळे  रत्नागिरी जिल्हाबंदी बरोबर बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य अथवा सोशल मिडीयामध्ये पोस्ट , चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ही माहिती देण्यात आलेली आहे..

       बारसू प्रकल्पास शेतक-यांनी तीव्र विरोध केलेला आहे.  यामुळे राज्य सरकार व शेतकरी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झालेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या संघर्षामध्ये शेतक-यांच्या बाजूने उडी घेतली असून त्यांचे प्रतिनिधी त्याठिकाणी ऊपस्थित राहून सदर प्रकल्पास विरोध केलेला आहे.   दरम्यान रत्नागिरी प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ३१ मे अखेर राजू शेट्टी यांना जिल्हाबंदीची नोटीस लागू केली असून यामध्ये त्यांनी सोशल मिडीयावरही पोस्ट , चित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्याबाबतही राजू शेट्टी यांच्यावर बंदी घातलेली आहे.अशी पोस्ट दिसल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. अप्पर  जिल्हाधिकारी यांचे वतीने व जिल्हा पोलिस प्रमुख यांचे वतीने रत्नागिरी पोलिस दलातील अधिकारी यांनी  राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी समक्ष ही नोटीस दिली  आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये व विविध ठिकाणी हिंसक आंदोलन करून कायदा व सुव्यवस्था बिघडविल्याचो कारण दाखवित सदर नोटीस लागू करण्यात आलेली आहे.

       यावर राजू शेट्टी यांनी अशा नोटीशींना मी भीक घालत नसून ज्याठिकाणी शेतकरी संकटात सापडेल त्याठिकाणी मी त्यांच्यासोबत ठामपणे ऊभा राहणार असल्याचे सांगितले आहे. लोकशाहीच्या राज्यामध्ये मानवी हक्कावर गदा आणण्याचे काम सरकार करत असून राज्य सरकार जनरल डायर प्रमाणे वागू लागले आहे. काही मुठभर लोकांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे काम करत असल्याची टिका राजू शेट्टी यांनी केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here