उरण दि. 9 (विठ्ठल ममताबादे ) : श्रद्धा आणि सबूरीचा संदेश देणारे महान संत साईबाबा यांचा शिष्य वर्ग, साईबाबांना मानणारा वर्ग उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी साईभक्तां मार्फत तसेच विविध मंडळामार्फत उरण ते शिर्डी पायी पदयात्रेचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही उरण तालुक्यातील ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून रविवार दि 9/10/2022 रोजी श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट नागाव अंबिकावाडी उरण येथून शिर्डीला जाण्यासाठी पदयात्री रवाना झाले आहेत.
सदर पदयात्रा 9/10 /2022 ते 17/10/2022 या दरम्यान असून 17/10/2022 रोजी दुपारी 4 वा पदयात्री शिर्डीत पोहोचणार आहेत. पहाटे 4 वाजता श्रीच्या चरण पादुका, पालखी पूजा काकड आरती , पुढील प्रस्थान,दुपारी 12 वा. मध्यान्ह आरती व साईचरित्र अध्याय पारायण, दु. 3 वा. ॐ श्री साईनाथाय नमः मंत्राचा जप व पुढील प्रस्थान, सायंकाळी 6:30 वा. धूप आरती, 6.30 ते 8 भजन किर्तन भारूड प्रवचन असे या पदयात्रेतील दिनचर्याचे स्वरूप आहे. पदयात्री श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर घरी उरणला परतल्यानंतर गुरुवार दि 20/10/2022 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत श्री साई सत्य नारायणाची महापूजा साई मंदिर नागाव येथे ठेवण्यात आले आहे यावेळी श्री साई भंडारा (महा प्रसादाचेही) आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी या साई भंडाराचा लाभ घ्यावा असे आवाहन ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळ उरण तर्फे करण्यात आले आहे.
ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळ उरणची स्थापना 2000 साली झाली असून उरण ते शिर्डी पदयात्रेचे यंदाचे 22 वे वर्ष आहे. सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने या पदयात्रेत सामील होतात.पदयात्री श्री साईबाबांचे नामस्मरण करत शिर्डीला पोहोचतात.सदर पदयात्रा व सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॐ श्री साईराम पदयात्रा मंडळाचे सर्व संचालक, मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, सर्व साई भक्त, पदयात्री, ग्रामस्थ विशेष मेहनत घेत आहेत.