५ नंबर साठवण तलावाचे काम समाधानकारक

0

अधिकाऱ्यांनी केली पाहणी

कोळपेवाडी वार्ताहर – आ.आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या सुरू असलेल्या कामाची नुकतेच बांधकाम व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून कोपरगाव नगरपरिषद योग्य पद्धतीने साठवण तलावाचे काम करवून घेत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. आ.आशुतोष काळे यांनी साठवण तलाव क्रमांक ५ व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी दिला असून साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाचे बांधकाम विभाग प्रमुख व पर्यावरण शाखा प्रमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथील अधिकारी एम. यू. खोब्रागडे यांनी रविवार (दि.१८) रोजी ५ नंबर साठवण तलावाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.यावेळी त्यांच्या समवेत नगरपालिका अभियंता सुनील काजवे, प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांचे प्रतिनिधी व लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी उपस्थित होते. ५ नंबर साठवण तलावाच्या कामाबरोबरच ९१ किलोमीटरची नवीन पाईपलाईन, पाणी पुरवठा करणाऱ्या १ ते ४ साठवण तलावांची दुरुस्ती तसेच कोपरगाव शहरातील संजयनगर, ब्रिजलाल नगर, गोरोबा नगर व मोहनीराज नगर या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे व लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती, बेट मोहनीराज नगर भागातील पाईपलाईन आदी कामांचा अधिकारी एम. यू. खोब्रागडे यांनी पाहणी केली. सुरू असलेल्या कामाची नगरपालिका अभियंता सुनील ताजवे, प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार यांचे प्रतिनिधी व लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. कोपरगाव नगरपरिषद ५ नंबर साठवण तलाव, वितरण व्यवस्था, जलकुंभ यांचे काम योग्य पद्धतीने करून घेत असल्याचे पाहणी अहवालात नमूद केले असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  शांताराम गोसावी यांनी दिली आहे . चौकट :- ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम मुदतीच्या आत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार लवकरात लवकर शहरातील नागरिकांना नियमित मुबलक पाणी देण्यासाठी नेमलेल्या कंपनीकडून योग्य पद्धतीने काम गुणवत्तेत व वेळेत पूर्ण कसे होईल यासाठी कोपरगाव नगर परिषद पुरेपूर प्रयत्न करणार आहे. – मुख्याधिकारी शांताराम गोसावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here