अलिबाग प्रतिनिधी : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित भव्य दिव्य अशा कार्यक्रमात नाशिक येथे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मनपा नाशिक आयुक्त मनिषा खत्री, आयएएस अधिकारी लीना बनसोड, प्रगती गृहउद्योग संचालिका पूजा कदम, शिखर स्वामिनी अध्यक्षा संगीता गायकवाड इ मान्यवर उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त समाजात स्वतःची प्रगती करीत असताना इतरांसाठी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या समाजासाठी भूषणावह असणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला यामध्ये अलिबाग येथील येथील एकल महिला ज्यांनी ४७ मुलींना दत्तक घेवून शिक्षण दिले व देत आहेत. अशा सामाजिक कार्यकर्ती तसेच ज्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असताना कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी सेविकांमधून पहिली वकील होण्याचा मान मिळविला. अशा ॲड.जीविता सूरज पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक ०९/०३/२०२५ रोजी दुपारी २:३० वाजता नाशिक येथील रोटरी सभागृह येथे संपन्न झाला. ॲड. जीविता पाटील यांनी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करीत असताना अनेक एकल महिलांना शिक्षणाची दिशा दाखवित स्वयंरोजगारासाठी प्रेरित केले असून अनेक मुलींना मार्गदर्शन करीत ज्या मुली अनाथ, एक पालकत्व तसेच गरीब गरजू आहेत. अशा मुलींना त्या स्वतः शिक्षण देत आहेत तर कित्येक दिव्यांग तसेच घरच्यांनी दुर्लक्ष केलेल्या महिलांना दरमहा विविध दात्यांच्या सहकार्याने राशन देण्याचे कार्य त्या आपल्या तेजस्विनी फाऊंडेशन तर्फे करीत आहेत.
वयाच्या २१ व्या वर्षी विधवापपण वाट्याला आले तरीही खचून न जाता आपल्या सासूच्या मदतीने भाजीचा व्यवसाय करीत व पुढे अतिशय तुटपुंज्या मानधनात अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत खंबीरपणे परिस्थितीवर मात करीत त्यांनी एम.ए.बीएड, एम.ए. एज्युकेशन, एम.एस.डब्ल्यू, एम.फिल, एल.एल.बी पर्यंत शिक्षण घेतले असून सध्या त्या प्राचार्या सानवी देशमुख तसेच सहाय्यक प्राचार्या धनश्री कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बी.सी.टी. कॉलेज ऑफ लॉ न्यू.पनवेल येथे एल.एल.एम. (मास्टर ऑफ लॉ) च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. तेजस्विनी फाऊंडेशन अध्यक्षा, पत्रकार, निवेदिका, लेखिका, व्याख्याता, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कौन्सलर, वकील अशा विविध भूमिका व जबाबदारी त्या लीलया पेलत असताना अनेक महिलांचा त्या आदर्श बनल्या आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेत बाळशास्त्री पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने त्यांना राष्ट्रीय स्वयंसिद्धा पुरस्कार २०२५ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.