अशी हि बनवाबनवी….मांजरपाड्याचे पाणी येवल्याकरिता का ? ओझरखेड धरण कार्यक्षेत्रा करिता?

0

अॅड. माणिकराव शिंदे यांचा सवाल,येवल्याकरिता तांब्याभर पाण्याचेही आरक्षण नाही.

येवला, प्रतिनिधी :

 ‌मांजरपाड्याचे पाणी पुणेगाव मध्ये येण्यास सुरुवात झाली असून पुणेगाव ७५% भरले आहे तर २८% भरलेल्या ओझरखेड मध्ये मांजरपाड्याचे पाणी येऊन तेही भरले जाईल या आशयाची बातमी आहे. याचा अर्थ मांजरपाडा धरणाच्या पाण्यावर येवल्याचा स्वतंत्र हक्क त्तर नाहीच परंतु या पाण्यावर येवल्याकरिता तांब्याभर पाण्याचेही आरक्षण नाही, हेच सत्य समजायचे का ? म्हणजे गेली २० वर्ष येवल्याच्या उत्तर भागाने मांजरपाड्याचे पाणी येण्याचे बघितलेले स्वप्न, मृगजळच ठरले समजून  हताश होऊन बसायचे का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे असा सवाल करून जेष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेश पदाधिकारी अॅड. माणिकराव शिंदे यांनी याप्रश्नी लक्ष वेधले आहे.

माजी आमदार जनार्धन पाटील यांचे काळात मा. शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री असतांना रोजगार हमीतून सुरु झालेला ओझरखेड हायलेव्हल कालवा. आता त्याचे नाव पुणेगाव-दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा आहे. पुणेगाव धरण ८/१० वर्षातून कधीतरी पूर्णपणे भरते. त्याची साठवण क्षमता ६५० द.ल.घ.फुट चे दरम्यान आहे. त्यातून पाणी मिळण्याची शक्यता खूप कमी होती. याच पुनेगावच्या पाण्यावर पूर्वीच २०-२५ वर्षापूर्वी ३५७ द.ल.घ. फुटाचे आरक्षण येवल्याकरिता २ मध्यम प्रकल्प व ३३ पाझर तलाव भरून देण्याकरिता झालेले आहे. त्यात मांजरपाड्याचे पाणी येऊन स्वप्न साकारले जाईल हीच अपेक्षा येवल्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांची होती. ८-१० वर्षातून कधीतरी भरणारे पुणेगाव धरन भरले तरी अगोदर त्या खालचे ओझरखेड धरण भरण्याचे नियोजन हे मांजरपाड्याच्या पाण्यापासूनच आहे. ओझरखेड धरण साधारण २१०० द.ल.घ. फुटाच्या क्षमतेचे आहे ते हि नियमित भरत नाही त्या करता मांजरपाडा धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी आले तर साधारण ५५० द.ल.घ. फुट पाणी येणार आहे. मांजरपाड्यावर स्वतंत्र येवल्याच्या करिता काही तरतूद नसेल तर गेली २० वर्षे मांजरपाडा पाणी हि बनवा बनवीच समजायची का ? हा माझा प्रश्न आहे 

कोणतेही प्रकारचे राजकारण करायचे नाही परंतु मांजरपाड्याचे पाणी पुणेगाव मध्ये ज्या ठिकाणी येते तिथ पासून येवल्यातील कातरणीच्या बंधाऱ्यापर्यंत बंद पाईप लाईन टाकणे हाच एकमेव पर्याय आहे. त्या दृष्टीने सरकारकडून मांजरपाड्याच्या पाण्यावर पुणेगाव मधील सध्याचे ३५७ द.ल.घ. फुटाचे पाणी आरक्षण आणि जादाचे मांजरपाड्याचे उर्वरित पाणी याचे एकत्रित ५००-५५० द.ल.घ. फुट पाण्याचे आरक्षण व्हावे तसेच कातरणी पर्यंत थेट पाईप लाईनचा निर्णय व्हावा हि माझी मागणी आहे, त्याकरिता मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री  मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब  यांनी सहकार्य करावे व याच योजनेचा विचार करावा ही नम्र विनंती. 

सध्या पुणेगाव ते दरसवाडी तसेच दरसवाडी ते डोंगरगाव पर्यंत काँक्रीटीकरण करण्याची योजना आहे. यातील कातरणी ते डोंगरगाव पर्यंत काँक्रीटीकरण ही चर्चेत असलेली योजना केवळ राजकारन्यांचे,  ठेकेदाराचे पोट भरण्याकरिताच वापरली जाईल, सरकारचे पैसेही वाया जातील आणि आता कधीतरी पाऊस पडून खोदून ठेवलेल्या कालव्यातून निसर्गामुळे वाहणारे, साठलेल्या पाण्याचा विहीर पाझर याकरता होणारा उपयोग हि बंद होईल. या काँक्रीटीकरणाच्या नादात हा शेतकऱ्यावर उगारलेला आसुडच  ठरेल. तेव्हा शेतकऱ्यांनी या तालुक्यात कातरणी ते डोंगरगावचे सरसकट काँक्रीटीकरणाचे काम होऊ देऊ नये. बंद पाडावे तसे न केल्यास स्वत;च्याच पायावर धोंडा पाडून घेण्याची कृती ठरेल असेही शिंदे यांनी जनहितार्थ प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here