शेतकरी विकास पॅनलच्या वतीने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे येवल्यात जल्लोषात स्वागत* *येवल्याच्या भल्यासाठी एकत्र येऊन सर्वांनी काम करावं
येवला, प्रतिनिधी :
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास पॅनलला मिळालेले यश हे निवडणुकीत रात्रंदिवस काम केलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच यश असून हा विजय मी त्यांना समर्पित करतो. येवल्याच्या विकासासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली ही एकजूट कायम ठेऊन एकदिलाने सामोरे जावे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश संपादन केले. आज छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर असतांना येवल्यात त्यांचे ढोलताशा वाजवत, फुलांची उधळण, फटाक्यांची आतशबाजी करत जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, शिवसेना नेते संभाजी पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, ज्येष्ठ नेते विश्वास बापू आहेर, शेतकरी संघटनेचे संतू पाटील झांबरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, शिवसेना तालुका प्रमुख रतन बोरनारे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, प्रकाश वाघ, अकबर शहा, ॲड.बाबासाहेब देशमुख, राजेश भांडगे, महेंद्र काले, मकरंद सोनवणे, मोहन शेलार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, सुनील पैठणकर यांच्यासह शेतकरी विकास पॅनलचे सर्व विजयी उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांच्या मनामध्ये किंतू परंतु नसावे. आगामी निवडणुका या एकदिलाने सामोरे जावे. तालुक्याचे राजकारण करायचे असेल तर ते एकदिलाने व्हायला हवे असे त्यांनी सांगितले.
सर्वांनी एकजुटीने निवडणूक लढविली त्याबद्दल सर्वांचे आभार मानत ते पुढे म्हणाले की, सर्व उमेदवारांना निवडणूक आणण्याची आपली जबाबदारी होती. मात्र आपले तीन उमेदवार पराभूत का झाले याचा देखील विचार करण्याची गरज आहे. आता निवडणूक आता संपली आहे. निवडणुकीतील राजकारण बाजूला ठेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यास प्राधान्य देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील नागरिकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्रित राहून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.