तुळापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी आणि भाजप दोन्हींचाही विजयाचा दावा देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतचे जसजसे निकाल लागले भाजप व राष्ट्रावादीत कोणाच्या ताब्यात किती ग्रामपंचायती आल्या दाखविण्याच्या नादात तुळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांचा माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.याचे छायचिञ व्हायरल होताच तुळापुरच्या सरपंच व सदस्यांनी राष्ट्रावादीचे कार्यालय गाठून आम्ही तुमचेच आहोत हे दाखविण्यासाठी व्हायरल झालेल्या छायचिञा पाठोपाठ तनपुरेंचा सत्कार स्वीकारताना छायचिञ व्हायरल करुन ग्रामपंचायतवर राष्ट्रावादीने दावा केला आहे.
याच तुळापूर ग्रामपंचायत मध्ये सरपंच सदस्य निवडीत पती-पत्नी हातात ग्रामपंचायतच्या चाव्या देण्यात आल्या. अंबादास हारदे यांची सरपंचपदी तर पत्नी अरूणा हारदे यांची सदस्यपदी मतदारांनी वर्णी लावली आहे. तुळापूर ग्रामपंचायतीचा गावाचा गाडा हाकण्यासाठी पती- पत्नीला गावाच्या संसाराची मिळालेली संधी चर्चेची ठरत आहे.तर प्रवरा पट्ट्यातील विखे पाटलांच्या ताब्यात असलेली सोनगाव ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक एक मध्ये मतदारांनी नोटावर मतदान रुपाने प्रेम दाखवले आहे. विजयी उमेदवार अकला रोहिदास काकडे यांच्यापेक्षा अवघे 3 मते कमी मिळाल्याने नोटाचा विजय होता होताच राहिला.नोटाच्या मतदानाची दिवसभर चर्चा सुरु होती.नोटाने माञ विजयी उमेदवाराला आत्मपरीक्षण करण्यास लावले आहे.
राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष व भाजपने सम चार ठिकाणी सत्ता मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. लोकनियुक्त सरपंच पदामुळे निवडणुकीमध्ये मोठी रंगत आली होती. आरडगाव, मानोरी, सोनगाव व कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीमध्ये भाजपची एकहाती सत्ता येत ‘कमळ’ फुलले तर राष्ट्रवादी प्रणित तनपुरे गटाने तुळापूर, खडांबे खुर्द, ताहाराबाद व मांजरी ग्रामपंचायतीमध्ये यश संपादित केले. कोंढवड, केंदळ खुर्द व ब्राम्हणगाव भांड येथे स्थानिक विकास आघाडीचे यश राहिले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची चाचपणी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले होते. त्यानुसार राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका या राष्ट्रवादीचे आ. प्राजक्त तनपुरे यांसह खा. डॉ. सुजय विखे व माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जात होत्या. दरम्यान, सोनगाव, कोल्हा खुर्द व मानोरी या गावामध्ये राष्ट्रवादीने निवडणूक न लढविता ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली. त्यानुसार सोनगाव व कोल्हार खुर्द मध्ये दोन्हीकडून विखे गटातच समोरासमोर लढत झाली. सोनगाव येथे सत्ता परिवर्तन होऊन जनसेवा मंडळ १ यांची सत्ता आली. कोल्हार खुर्द येथे दोन्ही गट हे भाजपचे होते. तेथे दिगंबर शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास मंडळाला सरपंच पदासह ९ जागेवर निर्विवाद जागा तर विरोधी जनसेवा मंडळाला ६ जागा मिळाल्या. तुळापूर ग्रामपंचायतीमध्ये विखे गटाच्या विकास मंडळा विरोधात ग्रामविकास मंडळाला राष्ट्रवादी प्रणित सत्ता मिळाली. राष्ट्रवादीच्या पॅनलला कर्डिले गटाच्या कार्यकर्त्यांनी समर्थन दिले होते. खडांबे खुर्द येथे पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब लटके यांनी राष्ट्रवादीची सत्ता मिळविण्यात यश मिळविले. खडांबे येथे राष्ट्रवादीने सरपंच पदासह सर्वाधिक १० जागा जिंकत यश मिळविले. भाजपला केवळ एकच जागा मिळाली.
ताहाराबाद ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने सत्ता पालट करीत सरपंच पदासह सर्वाधिक जागा जिंकल्या. संत महिपती महाराज यांच्या पावनभुमीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येताच कार्यकत्यांनी जल्लोष साजरा केला. आरडगाव ग्रामपंचायतीमध्ये तनपुरे कारखान्याचे संचालक रविंद्र म्हसे यांनी राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकली. तेथे वंचितची मोठी साथ लाभल्याने भाजपला नैदिप्यमान यश मिळाले. राष्ट्रवादीचे मते वंचितच्या वाट्याला गेल्याने तेथे भाजपची एकहाती सत्ता आल्याची चर्चा झाली.
मानोरी, सोनगाव, कोल्हार खुर्द व आरडगाव येथे निर्विवाद सत्ता हे
मिळविणाऱ्या भाजपने राहुरीत जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीला कडवी लढत देण्यास प्रारंभ केला तर राष्ट्रवादीचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी काही गावांमध्ये विखे गटाला पाठबळ तर काही गावांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवारच उभे न केल्याने भाजपला तीन गावात सत्ता मिळविण्यात अडचण आली नाही. राष्ट्रवादी पक्षाला ४ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले असले तरीही अपेक्षित कामगिरी करता आली नसल्याची
चर्चा आहे.
ब्राम्हणगाव भांड येथे संपूर्ण गावाने एकी करीत कोणताही गट, तट व पंक्ष न पाहता सविता राजेंद्र पवार यांना बिनविरोध सरपंच पदावर बसविले. तेथे ५ सदस्य बिनविरोध निवडून आले होते तर दोन जागांससाठी निवडणूक झाली.
केंदळ खुर्द गावातही सदस्यपदाच्या ९ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तेथे सरपंच पदासाठी गावाची सहमती न झाल्याने दोन्ही अपक्ष उमेदवारांमध्ये लढत झाली.तेथेही स्थानिक आघाडीच्या उमेदवारांने विजय मिळविला. कोंढवड गावामध्ये तरुणांनी शासकीय निवृत्त अधिकाऱ्यांना पाठबळ देत गट, तट व पक्ष बाजुला ठेवत विजय मिळविला आहे. आम्ही कोणत्याही पक्षाचे नसून केवळ विकासासाठी तरुणाई एकत्र आल्याचे सांगितले.
चौकट
‘तुळापूर ग्रामपंचायतवर भाजप व राष्ट्रावादीचा दावा’
तुळापूर ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांच्या निवडीचा निकाल जाहिर होताच माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यालयात तुळापूरच्या सरपंच व सदस्य यांना बोलावून घेवून सत्कार करण्यात आला.त्याचे छायचिञ व्हायरल करुन तुळापूर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला. परंतु हि गोष्ट तुळापूर ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना समजताच त्यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे कार्यालय गाठले आम्ही तुमचे असुन आमचा फसवून भाजपाने सत्कार केला. भाजप व राष्ट्रावादी कडून सत्कार स्वीकारतानाचे छायचिञ पुन्हा व्हायरल झाल्याने तुळापूर ग्रामपंचायत नेमकी कोणाची तर दोन्ही गटाने ‘ते’ आमचेच असा दावा केला आहे.
पती पत्नी हातात गावाचा कारभार
पती-पत्नी हाकणार ग्रामपंचायतीचा गाडा तुळापूर ग्रामपंचायतीमध्ये अंबादास हारदे यांची पत्नी अरूणा हारदे या दोघांनाही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये सेवा करण्याची संधी दिली. तुळापूर गावाचा गाडा हाकण्यासाठी पती- पत्नीला मिळालेली संधी चर्चेची ठरत आहे.
तेथे नोटांचा विजय होता होता राहिला..!
सोनगाव ग्रामपंचायतीच्या एक प्रभागामध्ये विजयी उमेदवार अकला रोहिदास कानडे यांना ३३३ मते मिळाली तर नोटाला ३३० मते मिळाली. विजयी उमेदवारापेक्षा केवळ ३ मते नोटाला कमी पडल्याची चर्चा सोनगाव परिसरात सुरु असुन विजयी उमेदवारास आत्मपरीक्षण करायला लावणारा हा मतदारांचा कौल आहे.