उद्या महाविकास आघाडीचा सरकारविरोधात मोर्चा तर भाजपचेही माफी मागो आंदोलन

जो काही मोर्चा आहे तो शांततेत निघावा. जी काही परवानगी आहे ती त्यांना दिलेली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तसेच भाजपचे मंत्री आणि नेते चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढा यांनी महापुरुषांसंदर्भात केलेली वादग्रस्त विधानं आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात शनिवारी (१७ डिसेंबर) मुंबईत महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे.
दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाकडूनही शनिवारी मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघात निदर्शनं केली जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप ‘माफी मागो’ आंदोलन करणार आहे.
मुंबई पोलिसांनी सुरुवातीला महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. परंतु काही अटीशर्थींसह आता मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे.

आता एकाच दिवशी (१७ डिसेंबर) महाविकास आघाडी आणि भाजप म्हणजेच सत्ताधारी आणि विरोधक रस्त्यावर उतरणार असल्याने यावरून राजकारण तापलं आहे.
महाविकास आघाडीचा मोर्चा कसा असेल?
“छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच भाजपच्या नेत्यांची वादग्रस्त विधानं याबाबत जनतेमध्ये प्रचंड रोष असून त्यासाठीच महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या,” असं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.
“हीच वेळ आहे जागं होण्याची आणि महामोर्चात सहभागी होण्याची,” असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्या या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ तसंच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनील परब, आदित्य ठाकरे असे नेते उपस्थित राहणार आहेत.
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असे पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीने आपल्या बैठकीत तिन्ही पक्षांना मोठ्या संख्यने कार्यकर्त्यांना जमवण्याचा आदेश दिले आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यातूनही कार्यकर्त्यांना जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षिण मुंबईत भायखळा पासून ते ‘टाईम्स ऑफ इंडिया’ इमारतीपर्यंत (सीएसएमटी रेल्वे स्टेशन समोर) महाविकास आघाडीचा मोर्चा आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक

महाराष्ट-कर्नाटक प्रश्नी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्त्वात एक बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सीमाभागासंदर्भात केलेली वक्तव्य आपली नसून ते ट्वीट त्यांनी केलं नाही असं स्पष्ट केलं. परंतु यावरून महाविकास आघाडीने भाजप सरकारवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “बसवराज बोम्मई यांच्या नावाने ज्या ट्वीटर खात्यावरून चिथावणीखोर ट्वीट करण्यात आले ते खातं बनावट होतं. हा खुलासा करण्यास एवढे दिवस का लागले? आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेले आणि हे केवळ ऐकून आले आले.”

शनिवारी (१७ डिसेंबर) होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चात प्रामुख्याने या मुद्यांवर घोषणाबाजी केली जाईल. तसंच प्रमुख नेते या मुद्यांवरूनच सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील.

‘मोर्चा शांततेत निघावा’
महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ते म्हणाले, “जो काही मोर्चा आहे तो शांततेत निघावा. जी काही परवानगी आहे ती त्यांना दिलेली आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करू. परंतु कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे याकडे आम्ही लक्ष देऊ.”

भाजपचं ‘माफी मांगो’ आंदोलन
महाविकास आघाडीच्या पाठोपाठ आता भाजपनेही शनिवारी (१७ डिसेंबर) आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले, “गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सुषमा अंधारे यांची वक्तव्ये समाजमाध्यमांवर येत आहेत. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि वारकरी यांचा अपमान केला जात आहे. हिंदू देवदेवतांचा अपमान समोर आल्यानंतरही उद्धव ठाकरे मौन सोडायला तयार नाहीत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here