सोलापूर : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत म्हसवड ते टेंभुर्णी असा प्रवास केला.
अनिल सावंत यांची राष्ट्रवादीतील नेत्यांशी सलगी वाढत असून पंढरपूर-मंगळवेढा मदारसंघातून तानाजी सावंतांचे पुतणे राष्ट्रवादीचे उमेदवार ठरतील का, अशी चर्चा रंगली आहे.
भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत जाऊन भेट घेतली होती, त्यावेळी त्यांनी आपण पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत. त्यासाठीच आपण शरद पवार यांची भेट घेतली होती, असे सावंत यांनी स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बुधवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे टेंभुर्णीतील कट्टर समर्थक सूरज देशमुख आणि नानासाहेब देशमुख यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या कार्यक्रमासाठी जयंत पाटील हे टेंभुर्णीमध्ये आले होते. त्या कार्यक्रमाला अनिल सावंत हे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी म्हसवड ते टेंभुर्णी असा जयंत पाटील यांच्याबरोबर एकत्रित प्रवास केला. या प्रवासामुळेच अनिल सावंत यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी सलगी वाढत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढ्यातून तानाजी सावंत यांचा पुतण्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे
दुसरीकडे भैरवनाथ शुगर हा कारखाना मंगळवेढा तालुक्यात असून या कारखान्याच्या माध्यमातून अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा राजकारणात सक्रिय आहेत. याशिवाय ते स्वतः पंढरपूर शहरात राहतात. विविध समाजिक उपक्रमात सहभागी असतात, त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीनंतर जयंत पाटील यांच्यासोबत प्रवास करणारे अनिल सावंत यांना जयंत पाटलांकडून कोणता शब्द मिळाला, असा सवाल चर्चिला जात आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याची राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी वाढल्याने शिंदे गटातून सावंतांविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्रामुख मनीष काळजे यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. तसेच, सावंतांनी पक्षाला फसविण्याचे उद्योग करू नयेत, असा इशारा दिला आहे.