तालुक्याच्या विकासाच्या वाटचालीत भक्कमपणे उभे राहा – आ. बाळासाहेब थोरात

0

संगमनेर  : अडचणीतून मार्ग काढत मोठ्या कष्टातून संगमनेर तालुक्याने प्रगती साधली आहे.येथील सहकार व विकास हा राज्याला आदर्शवत ठरला आहे. सध्या संकटकाळ असला तरी प्रत्येकाने आपली जबाबदारी मनापासून पार पाडत  तालुक्याच्या विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहावे असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचेेे वरिष्ठ नेते तथा  विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
             सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे ,ॲड. माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख ,कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात ,राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर.बी. राहणे उपस्थित होते.
              या वेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे.तालुक्याच्या यशामध्ये सर्वांचा वाटा असल्याने संगमनेर तालुका हा राज्यात दिमाखाने उभा आहे.निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणीवर मात करून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. बोगद्यांची कामे मार्गी लावली. मात्र २०१४ ते २०१९ काळात कालव्यांची  कामे थंडावली होती.२०१९ नंतर पुन्हा कालव्याच्या कामाला मोठी गती दिली. मोठा निधी मिळवला .रात्रंदिवस काम सुरू होते. ऑक्टोबर २०२२ मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडेचे पाणी देण्यासाठी आपण काम सुरू ठेवले होते. मात्र जूनमध्ये सत्तांतर झाले आणि कालव्यांची कामे थांबली.निळवंडेच्या कालव्यांची काम बंद करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात  माती कालवण्यासारखे आहे.मात्र ही कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजे.निळवंडेचे पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतात गेले पाहिजे यासाठी आपला कायम आग्रह राहणार आहे.तालुक्याच्या पाणी लढया संदर्भात हरिश्चंद्र फेडरेशनचे मोठे काम आहे. तर शेतकी संघाने आपला लौकिक निर्माण केला आहे.बँकिंग क्षेत्र सध्या अवघड झाले असून सर्व सहकारी संस्था या अत्यंत पारदर्शकपणे व  आदर्शवत काम करत आहेत. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी यशस्वी पार पडून तालुक्याच्या विकास वाटचालीत भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.
             आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असतानाही संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सहकार पंढरी म्हणून ओळखला जात आहे. येथील प्रत्येक संस्थेने आपला वेगळा लौकिक निर्माण केला आहे. ही परंपरा नवीन पदाधिकारी नक्कीच पुढे नेणार आहेत.
याप्रसंगी मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे ,रामदास वाघ, रामहरी कातोरे, संपतराव डोंगरे, अभिजीत ढोले, रोहिदास पवार ,सुभाष सांगळे, शांताराम कढणे, ह भ प नवनाथ महाराज आंधळे, भारत मुंगसे, सौ निर्मलाताई गुंजाळ, सौ. बेबीताई थोरात कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा ओहोळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

 चौकट :-
कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर अमृतवाहिनी बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन सुधाकर जोशी व व्हा. चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, व्हा.चेअरमन सुनील कडलग, हरिश्चंद्र फेडरेशनचे चेअरमन राजेंद्र गुंजाळ,व व्हा. चेअरमन महेश मोरे व संगमनेर एग्रीकल्चर मार्केटिंग प्रोसेसिंग कंपनीचे चेअरमन ॲड. सुहास आहेर आणि व्हा. चेअरमन विठ्ठलदास आसावा यांच्यासह तीन निवृत्त कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here