वडूज : प्रचारासाठी अवघ्या पंधरा दिवसांचा अवधी मिळाल्याने तळागाळातील मतदारापर्यंत पोहचू शकलो नाही. तरीही खटाव -माण तालुक्यातील जनतेने एक लाखापेक्षा जास्त मते देत आपणावर विश्वास व्यक्त केला. आगामी काळात पराभवाने खचून न जाता गावो गावच्या कार्यकर्त्यांशी कायम संपर्क ठेवून त्यांना पाठबळ देत जोमाने चळवळ उभी करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.
वडूज (ता.खटाव ) येथील अक्षता मंगल कार्यालयात कार्यकर्ता आभार व संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, अशोकराव गोडसे, प्रा. अर्जुन खाडे, संदिप मांडवे,राहुल पाटील, अनिल पवार,संभाजीराव फडतरे,डॉ.महेश गुरव, पृथ्वीराज गोडसे, दत्तात्रय पवार, विजय शिंदे, तानाजी देशमुख, शशिकला देशमुख, प्रीती घार्गे, सलमा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
घार्गे म्हणाले, लाडकी बहीण व अन्य योजनामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची निवडणूकीत पिछेहाट झाल्याचे जाणवते. या राज्यस्तरावरील विषयांमुळे आपणास ही पराभवास सामोरे जावे लागले. राज्यात विरोधी पक्षनेता नसणे म्हणजे राज्याची हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. चिरीमिरीच्या अपेक्षेने लोकानी विरोधकांना जवळ केल्याने आगामी काळात त्याचे दुरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत.
प्रभाकर देशमुख म्हणाले, लोकसभा निवडणूकीत महा विकास आघाडीला चांगले यश मिळाल्यानंतर राज्यकर्त्यांनी विविध योजना राबवून जनतेचा कौल मिळविण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणूकीत पराभव झाला असला तरी आपण कुठे कमी पडलो याचा विचार करावा. गाव पातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षांची ताकद चांगली आहे. आगामी काळात ही ताकद एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शरद पवार साहेबांची भूमिका शिरोधार्य मानून सर्वांनी एकदिलाने कार्यरत राहणे गरजेचे असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
यावेळी सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, डॉ.गुरव, दत्तात्रय पवार, विजय शिंदे, तानाजी देशमुख, तानाजी वायदंडे, जयवंत खराडे, बुवाभाई तोरणे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी प्राचार्य दिलीपराव डोईफोडे,,ॲड. संतोष पवार, सोमनाथ येवले, श्रीमंत पाटील, परेश जाधव, प्रा. सदाशिव खाडे, भिमराव जाधव, रविंद्र खाडे, धनाजी निंबाळकर, ज्ञानेश्वर शिंदे, प्रताप देशमुख, अरुण देशमुख, सोमनाथ साठे, पांडुरंग अहिवळे,सयाजी फडतरे आदी मान्यवरासह गावोगावचे कार्यकर्ते उपस्थित होते.