पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या उद्यापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे.
त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करून देखील शासन आणि प्रशासनाकडून केवळ दुर्लक्ष होत असून त्यांच्याकडून तारीख ते तारीख मिळत आहे. त्यामुळे आता 9 एप्रिलला सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दुरावस्था झालेल्या रस्त्याच्या संदर्भात चार मार्चला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र पीएमआरडीएच्या आयुक्तांनी रस्ता पुढील आठवड्यात दुरुस्त केला जाईल असा शब्द दिला होता त्यामुळे त्यांनी उपोषण स्थगित केलं. मात्र आता पीएमआरडीएच्या आयुक्तानी दिलेल्या आश्वासनाची तारीख संपून गेली असून अद्याप रस्त्याचं कोणतही काम पूर्ण झालं नाही. या शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षतेपणामुळे अखेर उद्यापासून सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. त्यामुळे आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट काय?
बारामती लोकसभा मतदारसंघातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणारा बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या साधारणतः एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. हा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी ग्रामस्थासह मी स्वतः वारंवार जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आणि जिल्हा परिषद पुणे , यांच्याकडे पाठपुरावा केला. महाशिवरात्रीपूर्वी रस्ता दुरुस्त व्हावा अन्यथा आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिल्यानंतर पीएमआरडीएने सदर रस्त्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याचे लेखी कळवले. पीएमआरडीए व जिल्हा परिषद या रस्त्याबाबत एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. या रस्त्याच्या निधीबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मी २६ फेब्रुवारी रोजी दिला होता. जिल्हा परिषद अथवा पीएमआरडीए यांच्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारचे आश्वासन अथवा ठोस कृती करण्यास तयार नाही. एका रस्त्यासाठी जर एवढा मोठा पाठपुरावा करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असेल तर ती शासन व प्रशासनाची असंवेदनशीलता आहे. याविरोधात मी दिलेल्या वेळेनुसार उद्या दि. ४ मार्च २०२५ पासून पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे, याची शासन व प्रशासनाने कृपया नोंद घ्यावी.