कराड : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एका मागून एक धक्के बसत आहेत. केंद्रात आणि राज्यातही पक्षाची सत्ता नसल्याने अनेक निकटवर्तीय साथ सोडून सत्तेच्या नौकेत उड्या मारू लागले आहेत.
गेल्या आठवड्यात एका बड्या नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पृथ्वीराजबाबा यांच्या आणखी एका निकटवर्तीयाने काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे पृथ्वीराजबाबांच्या पुढील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
खरं तर सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीपासूनच उतरती कळायला लागली. कारण, मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील हे निवडून आले होते. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा लोकसभेला पराभव झाला आणि काँग्रेस- राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील वर्चस्वाला ओहोटी लागण्यास सुरुवात झाली.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर मातब्बरांचे गड नेस्तनाबूत करत महायुतीने जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व मिळविले. कऱ्हाड उत्तरमधून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून पराभव झाला.
त्या पराभवानंतर त्यांचे एक एक सहकारी त्यांना सोडून महायुतीमधील पक्षात जात आहेत. काही जण भारतीय जनता पक्षाचा रस्ता धरत आहेत, तर कोणी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जात आहेत, त्यामुळे विधानसभेतील पराभवामुळे आधीच खचलेल्या काँग्रेसला पर्यायाने पृथ्वीराज चव्हाण यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत.
उंडाळकरांचा मोठा दावा
आयुष्यभर ज्यांनी काँग्रेसची विचारधारा जोपासली, ते माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र ॲड. उदयसिंह उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. तो पृथ्वीराजबाबांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण उंडाळकर यांनी या मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात आल्यानंतर मात्र त्यांनी कराड दक्षिण हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला.
एकीकडे उंडाळकर यांनी काँग्रेस सोडलेली असतानाच आणखी एका साथीदाराने पृथ्वीराज चव्हाण यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शंकराव खबाले यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. खबाले यांच्या या निर्णयामुळे कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची ताकद दिवसेंदिवस कमी होत असून असून भाजप आमदार अतुल भोसले गट मात्र मजबूत होताना दिसत आहे.
दरम्यान, विंग गटातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी, तसेच आपल्या कार्यकर्त्यांना बळ मिळावे, यासाठीच आपण सत्ताधारी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मागे दुसरा कुठलाही हेतू नाही, असे शंकराव खबाले यांनी स्पष्ट केले.