मंगळवेढा : गेल्या पाच वर्षांपासून मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील चारा छावणीचालकांची कोट्यवधी रुपयांची बिले शासनाकडून रखडली आहेत. अडचणीत सापडलेल्या छावणी चालकांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिका-यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही बिलासाठी अनुदान मिळत नाही.
अनुदान उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनास दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हा चेअरमन तानाजी खरात यांनी भेट दिली. मंगळवेढा व सांगोला तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी शासनाने चारा छावण्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार काहींनी स्वत: छावण्या चालवल्या तर बहुतांश जणांनी भागीदारीत छावण्या चालवल्या होत्या. वेळेवर बिले निघतील म्हणून तुटपुंज्या भांडवलावर अनेकांनी छावण्या चालवायला घेतल्या. बिले थकल्यामुळे आता छावणी चालकांची कसरत सुरू आहे.
चारा छावण्या बंद झाल्यानंतरही शासनाने बिले प्रलंबित ठेवली. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही आज नाही तर उद्या अनुदानाची बिले मिळतील, या आशेवर छावणी चालक चार- पाच वर्षांपासून बिलाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु अद्यापही चारा छावणी चालकांची बिले मिळालेली नाहीत. या बिलासाठी सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांनी धरणे आंदोलन सुरु केले असून त्यांची समस्या जाणून घेण्यासाठी संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक भारत बेदरे, गौडप्पा बिराजदार, तानाजी कांबळे,मूढवीचे सरपंच महावीर ठेंगील, छावणी चालक दौलतराव माने, महादेव जानकर, माधवानंद आकळे आले आणि आंदोलकांशी चर्चा केली.