संगमनेर : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सूचनेनुसार लोणी बुद्रूक येथील १२६ गटांच्या गाव नकाशाची दुरूस्ती करण्यात आली आहे. महसूल व भूमि अभिलेख विभागाने ही संयुक्त मोहीम राबवत ४० वर्षांपासून रखडलेले सदोष गाव नकाशे दुरूस्त करण्याचे उल्लेखनीय काम पूर्ण केले आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
लोणी बुद्रूक येथील गाव नकाशात प्रत्यक्ष जागेवरील वस्तूस्थितीप्रमाणे गटांचे स्थान सदस्य पद्धतीने दर्शवण्यात आलेले होते. राहाता तालुका भूमि अभिलेख विभागाने लोणी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या मदतीने याबाबत ग्रामस्थांकडून दुरूस्ती साठी अर्ज मागविले होते.सदर गाव नकाशांची सातबारा उताऱ्यामध्ये दुरुस्ती झालेली होती. मात्र गाव नकाशामध्ये दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे सदर नकाशे सदोष दिसून येत होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे,भूमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सुनिल इंदलकर, उपअधीक्षक नरेंद्र पाटील व शिरस्तेदार शैलेंद्र कचरे यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.
दुरुस्ती नकाशे लोणी येथील तलाठी व भूमीअभिलेख कार्यालयात उपलब्ध आहेत. खातेदारांनी पहाणी करून काही हरकत असल्यास नोंद करावी. असे आवाहन भूमी अभिलेख उपअधीक्षक नरेंद्र पाटील यांनी केले आहे.