शशिकांत शिंदे म्हणजे सातारा जिल्ह्यातील आसरानी; महेश शिंदे यांची खोचक टीका

0

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील भागांमध्ये असलेल्या पाण्याच्या दुष्काळावरून कोरेगाव तालुक्याचे वातावरण चागलंच तापलं आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केली होती.

त्यांच्या टीकेला आ. महेश शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून टोला लगावला आहे. “शशिकांत शिंदेंना सध्या आंदोलन करण्याशिवाय दुसरा उद्योगच काय आहे. त्यांच्या अवस्था शोले पिक्चर मधले असरानी सारखे झाले आहे. आधे इधर आधे उधर आणि बाकी मेरे पीछे आओ, असे शिंदेंचे झाले आहे,” अशी टीका आ. महेश शिंदे यांनी केली आहे.

आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आ. महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आ. शशिकांत शिंदेंच्या टीकेला प्रतिउत्तर दिले. यावेळी महेश शिंदे म्हणाले, गेली 25 वर्षे सत्ता आणि जलसंपदा विभागाचे मंत्री असून सुद्धा शशिकांत शिंदे या भागाचे पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत आणि आता खोटे आरोप करत आहेत. कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी आणि आजूबाजूच्या गावांचा आणि खटाव तालुक्याचा पाणी प्रश्न मीच सोडविणार आहे.

रामोशीवाडीच काय हा सर्व जो काही भाग आहे तो गेली 25 वर्षे टॅंकरने पाणी पितोय. 25 वर्षे त्यांची एकहाती सत्ता होती. 25 वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलंय. त्यावेळी त्यांचे हात कोणी बांधले नव्हते. आपल्याला जलसंपदामंत्री म्हणायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. तुमचे अपयश जनतेच्या माथी मारताय. सत्तेत होता, त्यावेळी तुम्हाला मतदारसंघातील जनता दिसली नाही. आता आसरानीच्या भूमिकेत जाऊन तुम्ही काहीही करु शकत नाही, असा टोला आ. महेश शिंदे यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here