स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे व पोलिस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी

0

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्नेहलताताई कोल्हे यांनी मानले आभार

कोपरगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन इमारत आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नवीन वसाहतीचा प्रश्न अखेर भाजपच्या प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे मार्गी लागला आहे. कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन इमारत आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या नवीन निवासस्थानांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने २८.५० कोटी रुपये निधी मंजूर केला असून, या कामाच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या आहेत. हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्नेहलताताई कोल्हे यांनी आभार मानले आहेत.

कोपरगाव शहर आणि तालुक्यासाठी पूर्वी एकच पोलिस ठाणे कार्यरत होते. कोपरगाव तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी कोपरगाव शहर व तालुका (ग्रामीण) पोलिस ठाणे असे दोन स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले. कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे गेल्या अनेक दिवसांपासून नगर परिषदेच्या इमारतीत कार्यरत आहे. ही जागा कामकाजाच्या दृष्टीने अपुरी व गैरसोयीची आहे. शहर पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीच्या पश्चिम बाजूस पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जुनी वसाहत आहे, जी पूर्णपणे मोडकळीस आली आहे. सदर इमारत दोन खोल्यांची असून, चटई क्षेत्र २०० चौरस फुटांपेक्षाही कमी आहे. पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही जागा राहण्यास अयोग्य व अतिशय अपुरी आहे. या इमारतीची दयनीय अवस्था झाली असून, या ठिकाणी पोलिस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जीव मुठीत धरून राहत आहेत. ही बाब लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सन २०१५ मध्ये नवीन नियोजित आराखड्याप्रमाणे कोपरगाव शहरातील पोलिस विभागाच्या सिटी सर्व्हे नं.१६२५ मध्ये ९७७७.८० चौरस मीटर (१०० गुंठे) १ हेक्टर २१ आरपैकी १ हेक्टर जागेत कोपरगाव शहर व तालुका (ग्रामीण) पोलिस स्टेशन इमारत तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी वसाहत उभारण्याबाबत राज्याच्या पोलिस महासंचालकांना प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव मंजूर करावा म्हणून तत्कालीन आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र पाठवून व प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला होता. स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारत बांधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ कोटी ३२ लाख रुपये निधी मंजूर केला व त्यातून शहर पोलिस ठाण्याची सुसज्ज नवी इमारत उभारण्यात आली असून, या नव्या इमारतीमध्ये दैनंदिन कामकाजही सुरू झालेले आहे; परंतु कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे अजूनही जुन्याच जागेत म्हणजे नगरपालिकेच्या इमारतीत कार्यरत आहे.

स्नेहलताताई कोल्हे यांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने २९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या बैठकीत कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे इमारत व पोलिस कर्मचारी वसाहतीत पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन ६४ घरे (क्वार्टर्स) सर्व सुविधांसह बांधण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली होती. दरम्यानच्या काळात २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. स्नेहलताताई कोल्हे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख व दिलीप वळसे पाटील यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या कामासाठी निधी उपलब्ध न करून  दिल्यामुळे हे काम रखडले होते. ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवे सरकार सत्तेत आल्यानंतर स्नेहलताताई कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पुन्हा पत्रव्यवहार करून कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे आणि कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह व अर्थ खाते असल्याने त्यांनी स्नेहलताताई कोल्हे यांच्या पत्राची दखल घेऊन अनेक दिवसांपासून रखडलेल्या कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे व कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकामास त्वरित मंजुरी देण्याचे आदेश संबंधितांना दिले. त्यानुसार या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, सरकारने २८.५० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

या निधीतून कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्याची नवीन सुसज्ज इमारत तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त २ बीएचकेचे ५६ फ्लॅट, ३ बीएचकेचे ८ फ्लॅट बांधण्यात येणार आहेत. या ठिकाणी कंपाऊंड वॉल, पार्किंग व्यवस्था, वसाहतीअंतर्गत रस्ते, ड्रेनेजलाईन, लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गतिशील सरकारने कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी व पोलिस अधिकारी-कर्मचारी वसाहतीत नवीन निवासस्थाने बांधण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, स्नेहलताताई कोल्हे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण पोलिस ठाणे व पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या नवीन इमारत बांधकामास मंजुरी मिळून हा प्रश्न मार्गी लागल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी कोल्हे यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here