उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )
दिनांक 16 जानेवारी व 17 जानेवारी 1984 च्या शौर्यशाली व गौरवशाली उरण शेतकरी लढ्यातील पंच हुतात्म्यांना अभिवादन करताना रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आदरांजली वाहिली.भूमीपुत्रांचा जमीन हक्क लढा ज्यातून 12.5% योजनेचा जन्म झाला, ज्या आंदोलनाने जमिनीच्या बदल्यात जमीन हे तत्व प्रस्थापित केले, ज्यामुळे आज नवी मुंबई, उरण पनवेल येथील भूमिपुत्र सुखाचे दोन घास खात आहे,आणि ज्या तत्वाचा फायदा आज संपूर्ण भारत देश घेतो, त्या आंदोलनातील हुतात्म्यांना व शेकडो लोक पोलिसांच्या गोळीबारात व लाठी हल्यात जखमी झालेत त्या सर्व शुरविरांना महेंद्र घरत यांनी विनम्र अभिवादन केले.दिनांक 16 जानेवारी 1984 रोजी जासई येथील पोलीस गोळीबारात हुतात्मा नामदेव शंकर घरत, हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर.या दोन शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर दिनांक 17 जानेवारी रोजी नवघर येथे पागोटे गावातील हुतात्मा केशव महादेव पाटील, हुतात्मा कमलाकर कृष्णा तांडेल, हुतात्मा महादेव हिरा पाटील यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अश्या या शूरवीरांनी 1984 च्या जमीन हक्क लढ्यात 16 जानेवारी आणि 17 जानेवारी रोजी हुतात्मे झाले त्यांना त्यांच्या बलिदान दिना निमित्त चिर्ले, धुतुम, जासई,पागोटे आदी ठिकाणी जाऊन महेंद्र घरत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.