गावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे मोठे आव्हान; ऐरोली, बेलापूरमध्ये उमेदवारांची कसरत

0

नवी मुंबई : बेलापूर व ऐरोली या दोन्ही मतदारसंघांत यंदा अत्यंत चुरशीच्या लढती होणार असून यंदा मोठ्या पक्ष बदलाच्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे निवडणुकांना अधिक रंगत आली असून मतदानाच्या दिवशी आपल्या मूळ गावच्या मतदारसंघात जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे अवघड काम नवी मुंबईतील उमेदवारांना करावे लागणार असल्याचे चित्र आहे.
दोन्ही मतदारसंघांत माथाडी कामगारांची मतदारसंख्या मोठी आहे. बेलापूर ते ऐरोली -दिघापर्यंत माथाडी कामगार मोठ्या प्रमाणात राहत असून माथाडी मतदार हे मतदानासाठी आपल्या मूळ गावी जातात. यंदाच्या निवडणुकीतही माथाडींचे नेते व माथाडींशी संपर्कात असलेले पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनेकांनी निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच नवी मुंबईत आपल्या मूळ गावच्या मतदारसंघातील मतदारांचे मेळावे नवी मुंबईत घेतले होते. २० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी मूळ गावी जाण्यासाठी उमेदवारांनी वाहनांचीही सोय केली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत माथाडी मतदारांना थांबवण्यासाठी नवी मुंबईतील उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

नेरुळ, सानपाडा, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली ते अगदी ऐरोलीपर्यंतच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार राहतात. या माथाडी कामगारांची नाळ आपल्या मूळ गावाशी व तेथील आमदारांशी जोडलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात माथाडी कामगारांशी जवळील असलेले माथाडींचे नेते शशिकांत शिंदे हे कोरेगाव, मकरंद पाटील हे वाई-खंडाळा-महाबळेश्वर, संग्राम पाटील हे भोर, शंभुराजे देसाई हे पाटण, शिवेंद्र राजे भोसले हे सातारा, तर पृथ्वीराज चव्हाण हे कराड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील आपले मूळ मतदार हे गावी मतदानाला आणण्यासाठी जवळजवळ या सर्वच उमेदवारांनी वाहनांची सोय केली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली मतदारसंघांतून मूळ गावी मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना रोखण्याचे काम दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार कसे करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यंदाची निवडणूक ही मोठ्या फरकाने नाही तर अत्यंत कमी मताच्या फरकाने निवडणुकीचे निकाल पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे गावी मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना रोखणे मोठे आव्हान ठरणार आहे.

नवी मुंबईत राहणाऱ्या माथाडी कामगारांची नाळ ही आपल्या मूळ गावाशी व आमदारांशी जोडली गेली आहे. त्यामुळे ते मतदानासाठी गावी जाणार हे निश्चित आहे. वाशी, कोपरखैरणे, घणसोली विभागांत माथाडी कामगारांची संख्या खूप मोठी आहे. माथाडी कामगारांशी जवळचा संपर्क असलेले पश्चिम महाराष्ट्रातील नेते आमदारकीला उभे आहेत. त्यामुळे माथाडी कामगार मतदानासाठी गावी जाणार हे निश्चित मानले जात आहे.
नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते
वाई, महाबळेश्वर, कोरेगाव तालुक्यांतील माथाडी कामगार हे मतदानासाठी गावाला जाणार आहेत. त्या त्या ठिकाणच्या आमदारांनी त्यांना गावी नेण्यासाठी बसेसची सोय केली आहे. त्यामुळे माथाडी कामगार गावी जाणार हे निश्चित आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here