माहूर : बंजारा समाजाच्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी तारीख 12 फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी गडावर लाखोच्या संख्येने समाज बांधवांनी यावे असे आवाहन अन्न व औषधं प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी लखमापुर(ता.माहूर) येथे केले आहे.
सेवा ध्वज स्थापना, संत सेवालाल महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व 593 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे दिनांक 12 फेब्रुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रमास बंजारा समाज बांधवांनी यावे याकरिता आज माहूर तालुक्यातील लखमापूर येथील श्री जगदंबा देवी मंदिर येथे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी समाज बांधवांशी संवाद साधला व पोहरादेवी गड येथे येण्याचे आवाहन केले. शिक्षण,आरोग्य, सामाजिक आरक्षण मिळवून घेण्यासाठी लोकशाही पद्धतीने समाज बांधवांची एकजूट आवश्यक आहे. पक्षभेद बाजूला सारून समाजासाठी एक दिवस एकत्र या असे आवाहनही मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
यावेळी नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, प्राध्यापक कैलास राठोड, सरपंच गणेश पाटील,भारत नाईक, उपसरपंच डी. के. चव्हाण,अमित राठोड, विशाल पवार, संतोष नाईक, अक्षय राठोड, संजय काशीराम जाधव,डी. डी. राठोड, वसंत राठोड, चेनसिंग चव्हाण, राजू राठोड,बंडू जमला राठोड,प्रेम सिंग राठोड, गणेश चव्हाण, धर्मा महाराज पुजारी जगदंबा माता मंदिर, विजय थावरा राठोड, योगेश जाधव यांच्या सह लखमापूर येथील पुरुष, महिला, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लखमापुर फाटा ते श्री जगदंबा देवी मंदिरापर्यंत दफड्यांच्या वाद्यात पारंपारिक पद्धतीने अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचे स्वागत करून भव्य मिरवणूक काढण्यात आली.