संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
येत्या रविवारी १८ डिसेंबर रोजी होणार असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार धामधूम सुरू झाली असून आपापला पॅनल निवडून आणण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांची कसोटी पणाला लागली आहे.
तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीसाठी रविवारी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे तसतशी स्थानिक पुढार्यांची धाकधूक वाढली आहे. मतदार यादी पहात आकडेमोड सुरू आहे. नाराज कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे काढून अनेकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून आपलेसे करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय स्थानिक पुढाऱ्यांकडून सुरू आहे. बांधावरच्या मतदारांकडे विशेष करून सर्वपक्षीय स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष असून त्यांच्यासाठी काय करता येईल याची रणनीती आखली जात आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जेवणावळींचा तडाखा होणार आहे. सध्या निवडणुकीचा काळ असल्याने कार्यकर्त्यांना भलतीच किंमत आली आहे. निवडणुकात दगा फटका होऊ नये म्हणून आत्तापासूनच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून दखल घेतली जात आहे. यंदाच्या या निवडणुका जोरदार होणार असल्याने सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकात बारीक-सारीक लक्ष ठेवून आहेत. ग्रामपंचायतीत सत्ता असणाऱ्या सत्ताधारी मंडळी पुढे सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे तर विरोधी मंडळीपुढे परिवर्तन घडवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या निवडणुकात सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने सर्वपक्षीय स्थानिक पुढाऱ्यांकडून गावात गुप्त बैठका सुरू आहेत. रुसवे फुगवे काढून कोणाला कसा गळ टाकायचा याची रणनीती आखली जात आहे. जसं जसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला आहे तसतसे संगमनेरच्या ३७ गावातील राजकीय वातावरण गरमागरम होऊ लागले आहे. रिक्षा, जीप, पिकअपला भोंगे लावून प्रचार सुरू आहे. अनेक गावात मोटार सायकलच्या रेल्या काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भले भले फ्लेक्स बोर्ड लावून निवडणुकीच्या वातावरणात रंग भरला जात आहे. एवढेच काय सोशल मीडिया वरून प्रचाराला भर दिला जात आहे. निवडणुकी संदर्भातील अनेक गमतीशीर जुन्या क्लिप्स मोबाईल वरून व्हायरल करून मतदारांचे मनोरंजनही केले जात आहे. संगमनेरच्या पूर्व भागातील व विशेषतः शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या गावातील निवडणुका जोरदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या गावात राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांत निवडणुकांचे घामासान सुरू आहे. निवडणुका होणार असणाऱ्या या गावातील बारीक सारीक गोष्टींवर खुद्द मंत्री विखे पाटील यांच्याबरोबरच माजी मंत्री थोरात हे सुद्धा बारीक लक्ष ठेवून आहेत. कुठल्याही परिस्थितीत या निवडणुकात गुलाल घ्यायचाच असा चंग विखे, थोरात समर्थकांनी बांधला असल्याने या निवडणुकात कोण कोणाला चित्रपट करणार हे मंगळवार दिनांक २० डिसेंबरच्या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
मी फक्त त्यांच्यासोबत हिंडतोय..!
सध्या सोशल मीडियावर निवडणुकी संदर्भातील एक विनोदी क्लिप प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मी फक्त त्यांच्यासोबत हिंडतोय मात्र मतदान तुम्हालाच करणार असा गंमतीशीर व्हिडिओ असल्याने मतदारांचेही क्लिप पाहून आणि या क्लिप सारख्या अनेक क्लिप पाहून मनोरंजन होत आहे.