उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील चिरनेर – खारपाडा रोडवरील घाटातील तलाखराच्या खिंडीत मातीने भरलेल्या अवजड व भरधाव डंपर चालकाचा वाहनाचा वाहनवरील ताबा सुटल्याने या डंपरच्या धडकेने विद्युत पोलासह रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या हेटवणे जलवाहिनीची चावी तोडल्याने जलवाहिनीतील पाण्याचा 25 फुटाहून अधिक उंचावर फवारा उडून हजारो लिटर पाणी वाया गेले. या अपघाताने सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.मात्र रस्त्यावरील विद्युत पोल व जलवाहिनीची चावी तुटल्याने या अपघातात जलवाहिनीचे नुकसान झाले असून, डंपरचे मोठे नुकसान झाले आहे.
चिरनेर – खारपाडा रोड वरून घाटातील तलाखराच्या खिंडीत उतारावर MH 46 BU 7712 या क्रमांकाचा समोरून पांढरा व ग्रे कलरची बॉडी असलेला मातीने भरलेला अवजड डंपर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन चालविण्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन येथील आदिवासी वाडीसाठी साकारण्यात आलेल्या विद्युत वाहिनीच्या पोलावर जोराने धडक देऊन नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हेटवणे जलवाहिनीच्या लोखंडी चावीसह, चावी सुरक्षिततेसाठी बनविण्यात आलेला 7 ते 8 फूट उंचीचा कठडाही होत्याचा नव्हता झाला आहे.त्यामळे या अपघातात जलवाहिनीची चावी तुटल्याने सुमारे दोन तास चावी उघडी पडल्याने 25 फूट उंचीवर पाण्याचा फवारा उडू लागला होता.
पाण्यासाठी कित्येक ठिकाणच्या नागरिकांना पावसाळा वगळता पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे. मात्र या डंपर अपघाताने हजारो लिटर पाणी वाया जाऊन तेथील नाला ओसांडून वाहू लागल्याचे दृश्य रस्त्यावरील वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी पाहिले आहे. हेटवणे पाणी पुरवठा विभागाला याची माहिती मिळाल्याने हेटवणे धरणाच्या दिशेने येणारा पाणीपुरवठा दोन तासानंतर बंद करण्यात आला असून, पाण्याचा प्रेशर कमी झाल्यावर या जलवाहिनीच्या अपघातात तुटलेल्या लोखंडी चावीचे काम सायंकाळ पर्यंत पूर्ण करून बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा सुरळीत करणार असल्याचे हेटवणे पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.