गतिरोधक बसवल्याने होणार अपघाताचे प्रमाण कमी. प्रवाशी-नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यात अनेक ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नसल्याने अनेक अपघात झालेले आहेत.या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले तर काही जणांचे मृत्यू देखील झाले आहेत. गतिरोधक नसल्याने अनेक अपघात वाढत चालले आहेत. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हायस्कुल मुळेखंड येथे शाळेत येताना जाताना विद्यार्थ्यांच्या जीवालाही रस्ता क्रॉस करताना धोका निर्माण झाला होता. वाहने वेगात जात असल्याने लहान मुलांना व पालकांना जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागत होता.
ही प्रमुख समस्या लक्षात घेऊन प्रवाशांचे , नागरिकांचे अपघात होऊ नयेत,अपघात होऊन कोणाचे मृत्यू होऊ नयेत या दृष्टिकोनातून प्रवाशी वर्गांचा प्रवास सुखकर, आनंददायी व्हावा या हेतूने उरण मधील सामाजिक कार्यकर्ते मयूर सुतार यांनी उरण पनवेल मुख्य मार्गावर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हायस्कुल मुळेखंड येथे स्पीड ब्रेकर (गतिरोधक ) बसविण्यात यावे अशी मागणी सिडको व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावाही केला होता.
आता या पाठपुराव्याला यश आले असून मयूर सुतार यांच्या मागणीची दखल घेण्यात आली असून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हायस्कुल समोर, मुळेखंड येथे गतिरोधक बसविण्यात आले आहेत. गतिरोधक बसविल्याने विविध वाहने सावकाश व शिस्त बद्ध पद्धतीने येत जात आहेत.गतिरोधक बसविल्याने आता नागरिकांचा प्रवास सुखकर, आनंददायी बनला आहे. गतिरोधक मुळे आता अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.शाळेतील लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना आता शाळेत येणे जाणे सोप्पे, सुलभ झाले आहे.त्यामुळे उरण मधील नागरिकांनी, जनतेने, शाळेतील विद्यार्थी, पालकांनी, शिक्षकांनी सामाजिक कार्यकर्ते मयूर सुतार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.