येवल्यात भव्य मोर्चा,तहसिल समोर ठिय्या,कार्यालयात शुकशुकाट!

0

येवला – प्रतिनिधी 

आज जुनी पेन्शन संदर्भात तालुक्यातील सर्व संघटना,प्राथमिक व माध्यमिक शिक्षक,आरोग्य संघटना,तलाठी संघटना,ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती संघटना या सर्व संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी होत आज आंदोलन केले. 

आज सकाळी दहा वाजता आंबेडकर पुतळ्याला हार घालून सर्व संघटनातील कार्यकर्त्यांची रॅली  तहसील कार्यालयावर काढण्यात आली.रस्त्याने अनेक कर्मचारी सहभागी होत होते.ज्यांना पेन्शन आहे ते किंवा ज्यांना पेन्शन नाही ते देखील सर्व मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयात सभेत झाले.या ठिकाणी सुमारे १५ ते २० मिनिटे जोरदार घोषणाबाजी करून कर्मचाऱ्यांनी एकाच मिशन जुनी पेन्शनचा नारा दिला.डोक्यात जुनी पेन्शनच्या टोप्या घालून महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले.

तहसील कार्यालयात प्रमुख नेत्यांनी संघटनांची भूमिका जाहीर केली आणि जुनी पेन्शन जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही अशी एकमेव मागणी लावून धरली. 

सरकार त्यांच्या हिताचे सर्वच निर्णय घेते,त्यावेळेस तिजोरीवर बोजा पडत नाही.आयुष्यभर सेवा देणाऱ्या कामगारांना पेन्शन देतानाच का सरकार अडचणी सांगते हा प्रश्न आहे.आपण एकजुटीने हा संप यशस्वी केल्यास नक्कीच शासनाला दखल घ्यावी लागणार आहे.मार्च एन्ड असल्यामुळे सर्वच कामे ठप्प होतील  तरच दखल होईल असे राष्ट्रसेवा झाल्याचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन कोकाटे म्हणाले.बारावीच्या परीक्षा मात्र यशस्वीपणे पार पाडू असा विश्वासही त्यांनी दिला.

शासनाकडून दबाव तंत्र वापरले जाईल,काही कारवाई होईल पण आपला आवाज बुलंद करून हा संप यशस्वी केल्यास नक्कीच पेन्शनचा लाभ मिळेल.पाच वर्ष सेवा देणाऱ्यांना आयुष्यभर पेन्शन आणि आयुष्यभर नोकरीची सेवा देणाऱ्यांना मात्र पेन्शन नाही हा अजब न्याय आहे.त्यामुळे सरकार विरोधात आवाज बुलंद करावा असे आवाहन ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा नेते रवींद्र शेलार यांनी केले. प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी बाजीराव सोनवणे यांनी आपण जर एकजूट राहिलो तर संघटन मजबूत होऊन हा लढा यशस्वी होईल.यासाठी एकोपा कायम ठेवण्याचे आवाहन केले.ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष रंगनाथ कदम,जुने पेन्शन कृती समितीचे हनुमंत काळे आदींनी अभी नही तो कभी नही चा नारा देत संप यशस्वी करण्याचे आवाहन केले.

यावेळी तहसीलदार प्रमोद हिले यांना मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी प्राथमिक शिक्षक संघटनेचे शांताराम काकड,नानासाहेब गोराणे,गोकुळ वाघ,साहेबराव होंडे,रणजीत परदेशी,हनुमंत काळे,किरण जाधव,दिपक थोरात,चंद्रकात जानकर,दिनेश मानकर,जयश्री राठोड,विजया हिरे,प्रतिभा चव्हाण,माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुरेश जोरी उपाध्यक्ष सुषमा पैठणकर रवींद्र तळेकर कार्यवाहक दिगंबर नारायणे तसेच जेष्ठ नेते अण्णासाहेब काटे,गंगाधर पवार, बाळासाहेब मोरे,दत्तकुमार उटावळे,पोपट बारे,अनिल साळुंखे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दीपक गायकवाड,डी.बी.नागरे, शरद ढोमसे,गोरख येवले,राजेंद्र पाखले,गोरख कुळधर,रामनाथ पाटील,वाल्मिक नागरे,अरुण विभुते,वैभव सोनवणे,प्रदीप पाटील,नाना लहरे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान,पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.विविध कार्यालयामध्ये देखील आज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शुकशुकाट दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here