गोंदवले – राजंणी पळशी ते सातारा पंढरपूर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी गेल्या चार वर्षापूर्वी ठेकेदाराने संपूर्णपणे उखडून टाकला आहे. त्यामुळे पळशी ग्रामस्थ ,प्रवाशी वाहनधारकांना या रस्त्यावरून खडी तुडवत उडालेल्या धुरूळ्यात जीव मुठीत धरून वाहने चालवून प्रवास करावा लागत आहे. रस्ता अपूर्ण ठेवणा-या ठेकेदारावर शासनाने कडक कारवाई करून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे,अन्यथा 1 मार्चला आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच शांताताई खाडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
सातारा पंढरपूर रस्त्याला हा मिळणारा रांजणी ते पळशी फाटा हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात येणार आहे.हा रस्ता करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने चार वर्षापूर्वी उखडून टाकला आहे,रस्ता उखडून त्यावर मुरमीकरण करण्यात आले व त्यावर खडीकरण करण्यात आले,मात्र यावरच रस्त्याचे काम बंद पडले आहे.रस्त्यावर टाकलेली खडी पूर्णपणे अस्ताव्यस्तपणे उखडली असून या उदासलेल्या खडीवरून वाहनधारकांना जीव मूठीत धरून कसरत करीत वहाने चालवावी लागत आहेत. कधीकधी उखडलेल्या खडीच्या रस्त्यावरून अनेक वाहने घसरून छोटे मोठे अपघात घडले आहेत.या धुळीचा परिणाम लहान मुले व वृध्द यांच्या आरोग्यावर होऊन आजारी पडत आहेत,तरी या अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी संबंधित खात्याच्या अधिका-यांनी लक्ष घालून काम अपूर्ण ठेवणा-या बेजाबदार ठेकेदारावर कारवाई करावी.
पळशीकरांनी दहिवडीला येण्याजाण्याचे मार्ग बदलले.
दहिवडीला जाणारा हा पळशीचा मुख्य रस्ता नवीन बनविण्यासाठी ठेकेदाराने उखडून ठेवल्याने या रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे. दुरावस्था झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना अपघाताला निमंत्रण नको या कारणांनी अनेकांनी आपले मार्गच बदलले आहेत. दहिवडीला येण्यासाठी अनेकजण मनकर्णवाडी मार्गे लोधवडे फाट्यावरून जातात.तर काही जन गावातून म्हसोबा मंदिर मार्गे माने वस्ती ते धामणी फाटा या पर्यायी रस्त्याचा वापर प्रामुख्याने करताना दिसत आहेत.
तहसिलदार यांना दिले निवेदन
पळशीच्या सरपंच शांताबाई खाडे,उपसरपंच केशव खाडे,डाॅ.भास्कर खाडे,ग्रामपंचायत सदस्य फुलाबाई साबळे,मानसिंग खाडे,संजय गंबरे,सुर्यकांत खाडे,विष्णू खाडे,विशाल नाकाडे,दिलीप गंबरे,शिवाजी खाडे,आदींनी आंदोलनाचे निवेदन माणचे तहसिलदार यांना दिले निवेदनात म्हटले आहे, हे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात आले नाही तर पळशी फाट्यावर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल तसेच तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून पळशी ग्रामस्थांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.अन्यथा 1 मार्च रोजी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.