येवला, प्रतिनिधी
धानोरे येथील श्रद्धा वैद्य या मुलीने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. तिच्या या यशाबद्दल धानोरे येथे सत्कार करण्यात आला.
धानोरे येथील साहेबराव वैद्य यांची ती मुलगी असून चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. अकरावी,बारावीसह बीएससीच्या पदवीसाठी ती येवल्यात स्वामी मुक्तानंद विद्यालयात सायकलवर पाच किलोमीटरचा प्रवास करून येत तिने शिक्षण पूर्ण केले आहेत.
२०१७ मध्ये पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर २०१९ पासून तिने एमपीएससी हा चंग बांधला आणि तयारी सुरू केली.सोबत बी.एडचे शिक्षणही पूर्ण केले. वर्षभर तिने येवल्यात स्टडी सर्कल क्लासमध्ये अभ्यास केला.मात्र मध्येच कोरोनाचे विघ्न आल्याने पुन्हा व्यत्यय आला.२०२० मध्ये ती पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिचा विवाह झाला. पण आई-वडिलांप्रमाणेच सासरची मंडळीही मार्गदर्शन करणारी आणि समजून घेणारी भेटली.सासरे शिक्षक असल्याने तिच्या या जिद्दीला अजून बळ मिळाले. पती बाळकृष्ण पठारे पोस्टात नोकरीला असल्याने त्यांनीही खास अभ्यासासाठी नगर येथे राहण्याचा निर्णय घेत स्वातंत्र्य दिले.घरीच अभ्यास करत तिने मुख्य परीक्षा ही उत्तीर्ण केली हे विशेष..!
वर्षभर निकाल उशिराने लागला असून पूर्व व मुख्य नंतर झालेल्या मुलाखतीत तिला ४० पैकी ३२ गुण मिळाले असून आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक स्कोर आहे.सरासरी २७-२८ गुण मुलाखतीला मिळतात,मात्र यापूर्वीचा सर्वोच्च गुण तिने मिळवले.राज्यात खुल्या प्रवर्गात मुलींमध्ये २३व्या क्रमांकाने ती पोलीस उपनिरीक्षक झाली आहे.परीक्षेसाठी कायदा विभागाचा पेपरला सर्वाधिक ८१ गुण मिळाले आहे.तिच्या या यशाबद्दल पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराजे पवार यांनी तिच्या घरी जाऊन सत्कार करत कौतुकही केले.यावेळी प्रवीण गायकवाड, बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब गायकवाड,संचालक
कांतीलाल साळवे,वैद्यकरत्न डॉ.सुरेश कांबळे,मनोज रंधे, नंदूआबा सोमासे,आबासाहेब आहेर,उमाकांत आहेर,योगेश भालेराव,तसेच पती बाळकृष्ण पठारे,आई छाया वैद्य,मोहनराव वैद्य,स्वप्निल वैद्य,अनंत वैद्य, सोमेश्वर वैद्य,मोरेश्वर वैद्य, नारायण सुराशे,देविदास शिंदे, संभाजी पडवळ,तानाजी पडवळ, दावल जाधव आदी उपस्थित होते.