प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर शक्ती पिठाचा चित्ररथ !

0

देशातील नागरिकांना महाराष्ट्रातील देवींच्या साडे तीन शक्ती पीठांचे होणार प्रजासत्ताक दिनी दर्शन!

माहूर: (बालाजी कोंडे) देशाची राजधानी नवी दिल्ली येथे 2023 च्या प्रजासत्ताक दिन महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्ती पीठांचे दर्शन चित्ररथाच्या माध्यमातून संचलनात होणार आहे.याबाबत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा कार्यालयातून माहिती मिळाली आहे.

सर्व मंगलमांगल्ये। शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी। नारायणी नमोस्तुते ।।माणसाला संकटातून पार पडण्याची ‘महाशक्ती‘ असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश होणार आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीतील परेडमध्ये चित्ररथ असणार का याबाबत शंका व्यक्त केली जात होती.मात्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असून मराठवाडा मुक्ती संग्रामाचेही हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्ली येथील राजपथावरील परडमध्ये समाविष्ट असावा, अशी विनंती मुनगंटीवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना केली होती.त्या मुळे आता २६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ यावेळी महाराष्ट्राला सादर करणार आहे.
महाराष्ट्राने आगामी प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी राज्यातील साडे तीन शक्तीपीठांचा महिमा वर्णन करणाऱ्या देखाव्याची निवड केली आहे. कोल्हापूर, तुळजापूर, श्रीक्षेत्र माहूर व वणीची सप्तशृंगी देवी या पीठांचे महात्म्य या चित्ररथाच्या माध्यमातून गीतसंगीताच्या माध्यमातून राजपथावर उलगडेल.त्याबरोबरच स्त्रीशक्तीचाही जागर होईल.विशेषतः या देखाव्याबरोबर देवीचा जागरण-गोंधळ सादर करणाऱया काही लोककलाकारांचा समावेश होण्याची शक्यता आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधींनी संस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात संपर्क केला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.
______________________
महाराष्ट्राचे चित्ररथ सातत्याने चर्चेत !
________________________
१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिली ११ वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात सहभागी झाला नव्हता.१९८० मध्ये शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथास प्रथमच अव्वल पारितोषिक मिळाले. त्यानंतर १९८३- बैलपोळा विषयावरील राज्याचा चित्ररथ सर्वोत्तम ठरला.त्यानंतर १९९३ मध्ये गणेशोत्सव,१९९४ मध्ये ‘शताब्दी‘ व त्यापुढच्या १९९५ मध्ये हापूस आंबे व बापू स्मृती या विषयांवरील राज्याच्या चित्ररथांनी प्रथम क्रमांक मिळविण्यामध्ये महाराष्ट्रची हॅटट्रिक केली. इ.स. १९८६, १९८८  २००९ मध्ये महाराष्ट्र राज्याचा अग्रक्रमांक थोडक्‍यात हुकला होता.त्यानंतर अलीकडे २०१४ मध्ये नारळी पौर्णिमा, २०१५-’पंढरीची वारी’ व २०१८ मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या विषयांवरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता.त्यानंतर २०१९ मध्ये राज्याने महात्मा गांधी यांच्या “चले जाव” चळवळीवर आधारित चित्ररथ सादर केला. २०२१ मध्ये ‘वारकरी संत परंपरा‘ या विषयावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आठ फूट उंचीची आसनस्थ मूर्ती हे या चित्ररथाचे आकर्षण होते. मागच्या वर्षी (२०२२) ‘जैवविविधता‘ या विषयावरील राज्याचा चित्ररथ जनतेची पसंती मिळविणाऱा अव्वल चित्ररथ ठरला होता.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here