येवला प्रतिनिधी :
येवला येथे परशुराम प्रतिष्ठान व अखिल ब्राह्मण समाज मंडळ,येवला यांच्या संयुक्त विद्यामानाने भगवान विष्णूचा सहावा अवतार व ब्राम्हण समाजाचे आद्य पुरुष तसेच रेणूकामातापुत्र भगवान परशुराम जयंती शोभयात्रेसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता विठ्ठल मंदिर सभागृह येथून भगवान परशुरामांच्या शोभयात्रेची सुरुवात करण्यात आली. शोभायात्रेत ब्राह्मण समाज महिलांच्या झांज पथकाने अतिशय उत्कृष्ठ सादरीकरण करून शोभा वाढवली. या शोभयात्रेत लहान थोरांनी उपस्थिती दाखवून आनंद लुटला,तसेच विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकात शोभयात्रेचे स्वागत करून आयोजकांचा सन्मान करत कौतुक केले.
भगवान परशुरामांच्या चित्ररथामध्ये चि.प्रथमेश कुलकर्णी याने भगवान परशुरामाचा वेश धारण करन उपस्थितांची मनं जिंकली. शोभायात्रा जय परशुरामाच्या जयघोषात, मंगलमय वातावरणात,शिस्तबद्ध पद्धतीने विठ्ठलमंदिर,मेनरोड,बालाजी गल्ली,आझाद चौक,काळामारुती रोड व विठ्ठलमंदिर येथे सांगता झाली. त्यानंतर विठ्ठल मंदिर सभागृहात वेदमंत्रांचे पठण तसेच शांतीसुक्ताचे पठण करण्यात आले. त्यानंतर भगवान परशुरामांची प्रतिमापूजन व आरती करण्यात आली. व महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी ब्राह्मण समाजबांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते.