अकोला : जिल्ह्यातील बाळापूर शहर व तालुक्यात सध्या खेकड्यांना मागणी वाढली आहे. बाळापूर शहरातून जाणाऱ्या मन व महेश तसेच भिकूंड नद्यांच्या किनारी तसेच ओढ्याच्या किनारी खेकडे मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. शेजारील पातूर तालुक्यातही खेकड्यांना मोठी मागणी आहे. नेमकं हेच गजानन सुरजुसे या युवकाने ओळखले आणि स्वतःच्या गावात खेकडा व्यवसाय सुरू केला असून या व्यवसायातून तो बऱ्यापैकी उत्पन्न मिळवत आहे.
खेकडे आणि खवय्ये यांचे नाते पूर्वापार असून खेकड्याची विशिष्ट चव आणि आरोग्याच्या दृष्टीने खेकडे महत्वाचे असल्याने मासळी बाजारात खेकड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. नेमके हेच हेरुन बाळापूर शहरातील गजानन सुरजुसे या उच्चशिक्षित तरुणाने खेकड्यांचा व्यवसाय करण्याचे ठरवले. गजानन सुरजुसे हा तरुण उच्चशिक्षित असून नोकरीच्या मागे न लागता त्याने स्वतः उभारलेल्या व्यवसायातून जीवनाची आर्थिक वाट शोधली आहे. मासेमारी करणे हा त्याच्या कुटुंबीयांचा पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र खवय्यांची खेकड्यांना असलेली मागणी पाहूण या युवकाने स्वतःच्या गावात खेकडा व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्या या खेकड्यांना मोठया प्रमाणावर मागणी येऊ लागली आहे.
बाळापूर, पातूर तालुक्यात नद्यांचे पात्र आहे. यंदा या परिसरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे पाण्या बरोबर खेकडे मोठ्या प्रमाणात वाहून आले आहेत. याचा फायदा गजानन सुरजुसे या तरुणाला होत आहे. यामुळे त्याच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत सुधारला आहे.