माहूर : माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीवरील दिगडी (कु.) उच्च पातळी बंधाऱ्यात हिंगणी ता.माहुर येथे आलेल्या तरुणाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (दि.14 फेब्रुवारी) घडली आहे.
मृतक रविंद्र मारोती शिंदे (वय ३२) विदर्भातील वर्धा येथील रहिवासी असून तो आय आय एफ एल बॅक या खाजगी बॅकेत मॅनेजर (व्यवस्थापक) या पदावर कार्यरत होता. मृतक रविंद्र शिंदे (मंगळवारी) रात्री त्याचे मामा बालाजी कापसे यांच्या कडे मौजे हिंगणी तालुका माहूर येथे भेटी साठी आला होता.
सकाळी हिंगणी गावा लगतच असलेल्या दिगडी कु. उच्च पातळी बंधाऱ्यावर पाणी बघण्यासाठी आपल्या चार चाकी वाहनाने गेला व बंधारा जवळुन बघण्यासाठी तो बाजुने बनवलेल्या पायऱ्याने खाली गेला व बघता बघता रविंद्र चा तोल जाऊन तो पाण्यात पडला कोणी तरी पाण्यात पडल्याचे कळताच बंधार्यावरील पुलावर उभ्या असलेल्या तरुणांनी बंधाऱ्याच्या पाण्यात उड्या मारुन मृतक रविंद्र ला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यंत रविंद्र ची प्राण ज्योत मालवली होती.
रवींद्र चा बुडून मृत्यू झाल्याने घटना पोलिसांना कळविण्यात आली.घटना कळताच पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी घटनास्थळ गाठून उपस्थित नागरिक व पोलिसांच्या मदतीने मयत रवींद्र चे शव पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले येथे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला रवींद्र च्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत .
पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शना खाली पो. हे. का. विजय आडे,पो.हे. का. पांडुरंग गुरनुले तपास करत आहेत.