कोपरगांवात पक्षांना पिण्याचे पाण्यासाठी मातीची भांडी

0

जागतिक चिमणी दिवस निमित्ताने उपक्रम

कोपरगांव/शिर्डी : वाढते तापमानाने प्रत्येक सजीव पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस होत आहे. अशा वेळी पक्षांचा नैसर्गिक अधिवास असलेल्या झाडांवर त्यांना पाणी पिण्यासाठी मातीची भांडी कोपरगांव येथील काही शाळांमध्ये वितरण करण्यात आली आहे. 

सामाजिक वनीकरण कार्यालय कोपरगांव वतीने नागरिकांना लोकसहभागातून उपक्रमांना प्रेरित करण्यासाठी कोपरगांव येथील विद्याप्रबोधिनी शाळा, डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालय यासह हरित सेनेत कार्यरत शाळांमध्ये पाणी पिण्यासाठी मातीची भांडी प्रातिनिधिक वितरण करण्यात आली आहे. नागरिकांनी लोकसहभागातून असा उपक्रम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे, वनपाल सुनिता यादव, महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके, डाॅ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब शिंदे, हरित सेना विभागप्रमुख प्रशांत घोटकर, सहाय्यक वेणुगोपाल आकलोड, अरुण बोरणारे विद्या प्रबोधिनीचे मुख्याध्यापक दत्तात्रय गवळी, नितीन शेटे, अमोल देवकर, स्वाती शेंदुर्णीकर यांचे सह शालेय विद्यार्थी उपस्थित होते. 

वाढते शहरी उद्योगिकरणामुळे वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असून त्याचा विपरीत परिणाम जीवसृष्टीवर होत आहे.निसर्गावर अवलंबून असलेल्या पशू, पक्षी, झाडे वेली यांचे जगणे असह्य होत आहे. अशा परिस्थितीत जीवसृष्टीतील महत्वाचा घटक चिमणी जगवुन संवर्धन आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी “घर तेथे चिमणी घर” यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचे आवाहन केले आहे. 

चीनने १९५८-६२ च्या दरम्यान चार कीटक मोहीम राबवली. त्यात त्यांनी पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजेच उंदीर, माश्या, डास आणि चिमण्या हे चार कीटक नष्ट करायचे ठरवले. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सुरू झालेल्या या चिमण्या मारण्याच्या अभियानमुळे चीनमध्ये चिमण्या जवळ जवळ संपुष्टात आल्या, ज्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला. पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरात, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव निर्माण झाली. जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे.

जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातोय.

चिमणी कमी होण्याचे प्रमाण –

१.उद्योगीकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण.

२.शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, फ्लॅट संस्कृतीतील सिमेंटची घरे यामुळे चिमण्या आपली घरे बनवू शकत नाहीत. आधीच्या काळात कौलारू घरं व त्यासमोर असणाऱ्या विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होते. बदलत्या बांधकामाच्या पद्धतीमूळे पक्षांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे.

३.कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले. 

४.शेतात होणाऱ्यी हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर, असले धान्य खाऊन चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

५.विणीच्या हंगामात (प्रजननकाळात) चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास.

६.वाहनं आणि गर्दीचा गोंगाट यामुळेही देखील चिमण्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

७.पाणथळीच्या जागा नष्ट झाल्याने पूर्वीचे अनेक पक्षी आता दिसत नाहीत.

८.जंगल तोडीमुळे चिमण्यांची घरटे नष्ट होतात.

चिमण्यांच्या संवर्धनाचे उपायः

१.पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.

२.पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे.

३.शेतीसाठी नीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.

४.‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे. 

अशा पर्यावरण हिताच्या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पक्षीप्रेमी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here